Bible Versions
Bible Books

Genesis 22 (MRV) Marathi Old BSI Version

1 या गोष्टी घडल्यानंतर देवाने अब्राहामाच्या विश्वासाची कसोटी घेण्याचे ठरवले. देवाने अब्राहामाला हाक मारली, “अब्राहाम”,आणि अब्राहाम म्हणाला, “मी येथे आहे”
2 देव म्हणाला, “तुझा एकुलता एक प्रिय पुत्र इसहाक याला घेऊन तू मोरिया देशात जा आणि तेथे, मी सांगेन त्या डोंगरावर माझ्यासाठी त्याचे होमार्पण कर.”
3 तेव्हा अब्राहाम पहाटेस उठला, त्याने खोगीर घालून आपले गाढव तयार केले; इसहाकाला दोन सेवकांना आपल्या बरोबर घेतले तसेच होमार्पणाकरिता लाकडे घेतली आणि मग ते सर्व देवाने सांगितलेल्या ठिकाणी गेले.
4 तीन दिवस प्रवास केल्यानंतर अब्राहामाने वर पाहिले तेव्हा काही अंतरावर त्याला जेथे जायचे होते ते ठिकाण दिसले.
5 मग अब्राहाम आपल्या सेवकांना म्हणाला, “तुम्ही येथे गाढवा जवळ थांबा; मी माझ्या मुलाला घेऊन त्या समोरच्या जागी जातो, देवाची उपासना करुन आम्ही माघारी येतो.”
6 अब्राहामाने लाकडे घेऊन मुल्याच्या खांद्यावर ठेवली; एक खास सुरा (बळी देण्याकरिता) आणि विस्तव घेतला. मग तो त्याचा मुलगा असे दोघे जण देवाची उपासना करण्यासाठी होमार्पणाच्या जागेकडे संगती निघाले.
7 इसहाकाने आपल्या बापास हाक मारली, “बाबा!”अब्राहामाने उत्तर दिले, “काय माझ्या प्रिय मुला?”इसहाक म्हणाला, “मला लाकडे विस्तव दिसतात, परंतु होमार्पणासाठी कोंकरु? ते कोठे आहे?”
8 अब्राहामाने उत्तर दिले, “माझ्या लाडक्या बाळा, होमार्पणासाठी लागणारे कोंकरु देव आपल्याला योग्यवेळी देईल.”तेव्हा अब्राहाम त्याचा मुलगा संगती निघाले
9 देवाने सांगिलेल्या ठिकाणी ते जाऊन पोहोंचले, तेथे अब्राहामाने एक वेदी बांधली, त्याने वेदीवर लाकडे रचली; नंतर त्याने आपला पुत्र इसहाक याला बांधून वेदीवरील लाकडावर ठेवले;
10 मग अब्राहामाने आपल्या मुलाचा बळी देण्यासाठी हातातील सुरा उंचावला.
11 परंतु तेवढ्यात, त्याच क्षणाला परमेश्वराच्या दूताने त्याला थांबवले; तो स्वर्गातून ओरडून त्याला म्हणाला,“अब्राहामा! अब्राहामा!”अब्राहामाने उत्तर दिले, “मी येथे आहे.”
12 देवदूत म्हणाला, “तू आपल्या मुलाला मारु नकोस, किंवा त्याला कोणत्याही प्रकारची इजा करु नकोस; कारण आता मला खात्रीने समजले की तू देवाला घाबरतोस आणि त्याचा आदर करतोस; कारण तू माझ्यासाठी आपल्या एकुलत्या एका लाडक्या पुत्रालाही, अर्पण करावयास मागेपुढे पाहता तयार झालास.”
13 आणि मग अब्राहामाने वर दृष्टि करुन सभोंवार पाहिले तेव्हा त्याला एका झुडपात शिंगे अडकलेला एक एडका दिसला; मग त्याने जाऊन तो घेतला परमेश्वराला होमार्पणासाठी त्याचा बळी दिला. अशा रीतीने अब्राहामाचा मुलगा इसहाक वांचला.
14 तेव्हा अब्राहामाने त्या जागेला, “याव्हे यिरे” असे नाव दिले; आणि आजवर देखील, “या डोंगरावर परमेश्वर दिसू शकतो असे लोक बोलतात.”
15 नंतर स्वर्गातून परमेश्वराच्या दूताने अब्राहामास दुसऱ्यांदा हाक मारली.
16 तो म्हणाला, “परमेश्वर म्हणतो की तू माझ्यासाठी तुझ्या एकुलत्या एका लाडक्या मुलाचा बळी द्यावयांस मागे पुढे पाहता तयार झालास म्हणून मी परमेश्वर स्वत:ची शपथ घेऊन तुला वचन देती की
17 मी खरोखर तुला आशीर्वाद देईन तुझी वाढ करीन; मी तुला असंख्य वंशज देईन; तुझी संतती आकाशातील ताऱ्याइतकी, समुद्रकिनाऱ्यावरील वाळू इतकी होईल असे मी करीन; आणि तुझी संतनी आपल्या सर्व शत्रुंचा पराभव करुन त्यांना जिंकेल.
18 पृथ्वीवरील प्रत्येक राष्ट्र तुझ्या वंशजाद्वारे आशीर्वाद पावेल; तू माझ्या सर्व आज्ञा पाळल्यास म्हणून मी हे करीन.”
19 मग अब्राहाम आपल्या सेवकाकडे मागे आला आणि अब्राहाम, इसहाक त्याचे सेवक असे सर्व मिळून प्रवास करीत मागे बैरशेबाला गेले; आणि अब्राहामाने बैर - शेबा येथे वस्ती केली.
20 या सर्व गोष्टी घडल्यानंतर अब्राहामाला असा निरोप आला, “पाहा तुझा भाऊ नाहोर त्याची बायको मिल्का यांनाही आता मुले झाली आहेतच.
21 त्यांच्या पहिल्या मुलाचे नाव ऊस, दुसऱ्याचे बूज, तिसऱ्याचे कमुवेल - हा आरामाचा बाप;
22 त्यानंतर केसेद, हजो, पिलदाश, यिदलाप आणि बथुवेल अशी त्यांची नावे आहेत”
23 बथुवेल रिबकाचा बाप होता. अब्राहामाचा भाऊ नाहोर याजपासून मिल्केला हे आठ मुलगे झाले;
24 आणि त्याची स्त्रीगुलाम रेऊमा हिलाही त्याच्या पासून तेबाह, गहाम, लहश माका हे चार मुलगे झाले.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×