Bible Language
Marathi Old BSI Version

:

1. याच सुमारास यराबामचा मुलगा अबीया आजारी पडला.
2. तेव्हा यराबाम आपल्या बायकोला म्हणाला, “तू शिलो येथे जाऊन तिथल्या अहीया या संदेष्ट्याला भेट. मी इस्राएलचा राजा होणार हे भाकित त्यानेच केले होते. तसेच वेष पालटून जा म्हणजे लोक तुला माझी पत्नी म्हणून ओळखणार नाहीत.
3. संदेष्ट्याला तू दहा भाकरी, काही पुऱ्या आणि मधाचा बुधला दे. मग आपल्या मुलाबद्दल विचार. अहीया तुला काय ते सांगेल.”
4. मग राजाने सांगितल्यावरुन त्याची बायको शिलोला अहीया या संदेष्ट्याच्या घरी गेली. अहीया खूप वृध्द झाला होता आणि म्हातारपणामुळे त्याला अंधत्वही आले होते.
5. पण परमेश्वराने त्याला सूचना केली, “यराबामची बायको आपल्या मुलाबद्दल विचारायला तुझ्याकडे येते आहे. तिचा मुलगा फार आजारी आहे.” मग अहीयाने तिला काय सांगायचे तेही परमेश्वराने त्याला सांगितले.यराबामची बायको अहीयाच्या घरी आली. लोकांना कळू नये म्हणून तिने वेष पालटला होता.
6. अहीयाला दारात तिची चाहूल लागली तेव्हा तो म्हणाला, “यराबामची बायको ना तू? आत ये आपण कोण ते लोकांनी ओळखू नये म्हणून का धडपड करतेस? मला एक वाईट गोष्ट तुझ्या कानावर घालायची आहे.
7. परत जाशील तेव्हा इस्राएलचा परमेश्वर देव काय म्हणतो ते यराबामला सांग. परमेश्वर म्हणतो, ‘अरे यराबाम, इस्राएलच्या समस्त प्रजेतून मी तुझी निवड केली. तुझ्या हाती त्यांची सत्ता सोपवली.
8. याआधी इस्राएलवर दावीदाच्या घराण्याचे राज्य होते. पण त्यांच्या हातून ते काढून घेऊन मी तुला राजा केले. पण माझा सेवक दावीद याच्यासारखा तू निघाला नाहीस तो नेहमी माझ्या आज्ञेप्रमाणे वागत असे. मन:पूर्वक मलाच अनुसरत असे. मला मान्य असलेल्या गोष्टीच तो करी.
9. पण तुझ्या हातून अनेक पातके घडली आहेत. तुझ्या आधीच्या कोणत्याही सत्ताधीशापेक्षा ती अधिक गंभीर आहेत. माझा मार्ग तू केव्हाच सोडून दिला आहेस. तू इतर देवदेवतांच्या मूर्ती केल्यास याचा मला खूप राग आला आहे.
10. तेव्हा यराबाम, तुझ्या घरात मी आता संकट निर्माण करीन. तुझ्या घरातील सर्व पुरुषांचा मी वध करीन. आगीत गवताची काहीही शिल्लक राहात नाही त्याप्रमाणे मी तुझ्या घराण्याचा समूळ उच्छेद करीन.
11. तुझ्या घरातल्या ज्याला गावात मरण येईल त्याला कुत्री खातील आणि शेतात, रानावनात मरणारा पक्ष्यांचे भक्ष्य होईल. परमेश्वर हे बोलला आहे.”
12. अहीया संदेष्टा मग यराबामच्या बायकोशी बोलत राहीला. त्याने तिला सांगितले, “आता तू घरी परत जा. तू गावात शिरल्याबरोबर तुझा मुलगा मरणार आहे.
13. सर्व इस्राएल लोक त्याच्यासाठी शोक करतील आणि त्याचे दफन करतील. ज्याचे रीतसर दफन होईल असा यराबामच्या घराण्यताला हा एवढाच कारण फक्त त्याच्यावरच इस्राएलचा देव परमेश्वर प्रसन्न आहे.
14. परमेश्वर इस्राएलवर नवीन राजा नेमील. तो यराबामच्या कुळाचा सर्वनाश करील. हे सगळे लौकरच घडेल.
15. मग परमेश्वर इस्राएलला चांगला तडाखा देईल. इस्राएल लोक त्याने भयभीत होतील. पाण्यातल्या गवतासारखे कापतील. इस्राएलच्या पूर्वजांना परमेश्वराने ही चांगली भूमी दिली. तिच्यातून या लोकांना उपटून परमेश्वर त्यांना युफ्रटिस नदीपलीकडे विखरुन टाकील. परमेश्वर आता त्यांच्यावर भयंकर संतापलेला आहे, म्हणून तो असे करील. अशेरा देवीचे स्तंभ त्यांनी उभारले याचा त्याला संताप आला.
16. आधी यराबामच्या हातून पाप घडले. मग त्याने इस्राएल लोकांना पापाला उद्युक्त केले. तेव्हा परमेश्वर त्यांना पराभूत करील.”
17. यराबामची बायको तिरसा येथे परतली. तिने घरात पाऊल टाकताक्षणीच तिचा मुलगा वारला.
18. सर्व इस्राएल लोकांना त्याच्या मृत्यूचे दु:ख झाले. त्यांनी त्याचे दफन केले. या गोष्टी परमेश्वरच्या भाकिताप्रमाणेच घडल्या. हे वर्तवण्यासाठी त्याने त्याचा सेवक अहीया या संदेष्ट्याची योजना केली होती.
19. राजा यराबामने आणखीही बऱ्याच गोष्टी केल्या लढाया केल्या, लोकांवर तो राज्य करत राहिला. इस्राएलच्या राजांचा इतिहास या ग्रंथात, त्याने जे जे केले त्याची नोंद आहे.
20. बावीस वर्षे तो राजा म्हणून सत्तेवर होता. नंतर तो मृत्यू पावला आणि आपल्या पूर्वजांबरोबर त्याचे दफन झाले. त्याचा मुलगा नादाब त्याच्यानंतर सत्तेवर आला.
21. शलमोनाचा मुलगा रहबाम यहूदाचा राजा झाला तेव्हा तो एक्के चाळीस वर्षाचा होता. यरुशलेममध्ये त्याने सतरा वर्षे राज्य केले. परमेश्वराने स्वत:च्या सन्मानासाठी या नगराची निवड केली होती. इस्राएलमधल्या इतर नगरामधून त्याने हेच निवडले होते. रहबामच्या आईचे नाव नामा. ती अम्मोनी होती.
22. यहूदाच्या लोकांच्या हातूनही अपराध घडले आणि परमेश्वराने जे करु नका म्हणून सांगितले ते त्यांनी केले. परमेश्वराने कोप होईल अशा चुका त्यांच्या हातून होतच राहिल्या. त्यांच्या पूर्वजांच्या पापांपेक्षाही त्यांची पापे वाईट होती.
23. या लोकांनी उंचवट्यावरील देऊळे, दगडी स्मारके आणि स्तंभ उभारले. खोट्यानाट्या दैवतासाठी हे सारे होते. प्रत्येक टेकडीवर आणि हिरव्यागार वृक्षाखाली त्यांनी या गोष्टी बांधल्या.
24. परमेश्वराच्या पूजेचा एक भाग म्हणून लैंगिक उपभोगासाठी शरीरविक्रय करणारेही होते. अशी अनेक दुष्कृत्ये यहूदाच्या लोकांनी केली. या प्रदेशात याआधी जे लोक राहात असत तेही अशाच गोष्टी करत. म्हणून देवाने त्यांच्याकडून तो प्रदेश काढून घेऊन इस्राएलच्या लोकांना दिला होता.
25. रहबामच्या कारकिर्दीचे पाचवे वर्ष चालू असताना मिसरचा राजा शिशक याने यरुशलेमवर स्वारी केली.
26. त्याने परमेश्वराच्या मंदिरातील आणि महालातील खजिना लुटला. अरामचा राजा हददेजर याच्या सैनिकांकडून दावीदाने ज्या सोन्याच्या ढाली आणल्या होत्या त्याही त्याने पळवल्या. दावीदाने त्या यरुशलेममध्ये ठेवल्या होत्या. सोन्याच्या सगळ्या ढाली शिशकने नेल्या.
27. मग रहबामने त्यांच्या ऐवजी दुसऱ्या ढाली केल्या, पण या मात्र पितळी होत्या, सोन्याच्या नव्हत्या. महालाच्या दरवाजावर रखवाली करणाऱ्यांना त्याने त्या दिल्या.
28. राजा परमेश्वराच्या मंदिरात जात असे तेव्हा प्रत्येक वेळी हे शिपाई बरोबर असत. ते या ढाली वाहात आणि काम झाल्यावर त्या ढाली ते परत आपल्या ठाण्यात भिंतीवर लटकावून ठेवत.
29. ‘यहूदाच्या राजांचा इतिहास’ या ग्रंथात राजा रहबामच्या सर्व गोष्टींची नोंद आहे.
30. रहबाम यराबाम यांचे परस्परांत अखंड युध्द चाललेले होते.
31. रहबाम वारला आणि त्याचे आपल्या पूर्वजांबरोबर दफन झाले. दावीद नगरात त्याला पुरले. (याची आई नामा ती अम्मोनी होती) रहबामचा मुलगा अबीया नंतर राज्यावर आला.