Bible Books

:

1. शलमोनाची प्रार्थना संपल्याबरोबर स्वर्गातून अग्नी खाली उतरला आणि त्याने होमबली आणि यज्ञार्पणे भस्मसात केली. परमेश्वराच्या लखलखीत तेजाने मंदिर भरुन गेले.
2. त्या तेजाने दिपून याजकांनाही परमेश्वराच्या मंदिरात जाता येईना.
3. थेट स्वर्गातून अग्री खाली येणे आणि परमेश्वराचे तेज मंदिरावर पसरणे या गोष्टी इस्राएलच्या समस्त लोकांनी पाहिल्या. तेव्हा त्यांनी जमिनीपर्यंत लवून नमन केले, परमेश्वराला धन्यवाद दिले आणि ते म्हणाले, “परमेश्वर चांगला आहे त्याची कृपा सर्वकाळ राहाते.”
4. मग शलमोनाने आणि सर्व इस्राएल लोकांनी परमेश्वरापुढे यज्ञ केले.
5. राजा शलमोनाने 22,000 बैल आणि 1,20,000 मेंढरे वाहिली. राजा आणि प्रजा यांनी देवाच्या मंदिराची प्रतिष्ठापना केली. ते फक्त उपासनेसाठी वापरायचे होते.
6. याजक आपल्या कामाला सिध्द झाले. परमेश्वराच्या भजनाची वाद्ये घेऊन लेवी ही उभे राहिले. राजा दावीदाने ही वाद्ये परमेश्वराच्या स्तवनासाठी करुन घेतली होती. “परमेश्वराचे स्तवन करा कारण त्याची कृपा चिरंतन आहे” असे याजक आणि लेवी गात होते. लेवींच्या समोर उभे राहून याजक कर्णे वाजवत होते. सर्व इस्राएल लोक तिथे उभे होते.
7. मंदिरासमोरचे मधले आवार शलमोनाने पवित्र केले. या जागी त्याने होमार्पणे आणि शांतिअर्पणांची वपा वाहिली. होमार्पणे, अन्नार्पणे आणि वपा यांचे प्रमाण एवढे प्रचंड होते की पितळी वेदीवर ते सर्व मावेना म्हणून मधले आवार त्याने वापरले.
8. शलमोन आणि इस्राएल लोक यांनी सात दिवस हा सण साजरा केला. हमाथच्या वेशीपासून ते मिसरच्या झऱ्या पर्यंतच्या भागातले सगळे इस्राएल लोक इथे आल्यामुळे शलमोनबरोबरचा जमाव खूपच मोठा होता.
9. आठव्या दिवशी त्यांनी पवित्र सभा घेतली कारण त्या आधी सात दिवस त्यांनी सण साजरा केला होता. वेदी पवित्र करुन ती परमेश्वराला समर्पण केली. ती फक्त परमेश्वराच्या उपासनेसाठी वापरायची होती. सात दिवस त्यांनी सण साजरा केला.
10. सातव्या महिन्याच्या तेविसाव्या दिवशी शलमोनाने लोकांना घरोघरी परतायला सांगितले. दावीद, शलमोन आणि इस्राएल लोक यांच्यावर परमेश्वराने कृपा केल्यामुळे लोक आनंदी झाले होते. त्यांची अंत:करणे आनंदाने भरुन गेली होती.
11. परमेश्वराचे मंदिर आणि राजगृह बांधण्याचे काम शलमोनाने पार पाडले. परमेश्वराचे मंदिर आणि आपले निवासस्थान यांच्याबाबतीत योजलेल्या सर्व गोष्टी त्याने यशस्वीपणे पूर्ण केल्या.
12. नंतर एकदा रात्री परमेश्वराने शलमोनाला दर्शन दिले. तो शलमोनाला म्हणाला, “शलमोना तुझी प्रार्थना मी ऐकली आहे. हे स्थळ यज्ञगृह म्हणून मी निवडले आहे.
13. कधी जर मी पर्जन्यवृष्टी होऊ नये म्हणून आकाशमार्ग बंद केला, धान्य फस्त करायला टोळधाड पाठवली किंवा रोगाराईचा प्रसार केला
14. आणि अशावेळी लोकांनी नम्र होऊन माझा धावा करुन माझ्या दर्शनाची इच्छा बाळगली, दुराचाराचा त्याग केला तर मी स्वार्गातून त्यांच्या हाकेला देईन. त्यांना त्यांच्या पापाची क्षम करीन आणि त्यांची भूमी संकटमुक्त करीन.
15. आता माझी दृष्टी या ठिकाणी वळलेली आहे. इथे होणाऱ्या प्रार्थना ऐकायला माझे कान उत्सुक आहेत.
16. हे मंदिर मी माझे म्हणून निवडले आहे.माझे नाव इथे सदासर्वकाळ राहोव म्हणून मी हे स्थान पवित्र केले आहे. माझी दृष्टी आणि माझे चित्त नेहमी या मंदिराकडे लागलेले असेल.
17. “शलमोना, तुझे वडील दावीद यांच्याप्रमाणेच तू माझ्याशी वागलास, माझ्या आज्ञांचे पालन केलेस, माझे विधी आणि नियम पाळलेस,
18. तर मी तुला समर्थ राजा बनवील आणि तुझे राज्य महान होईल. तुझे वडील दावीद यांना मी तसे वचन दिले आहे. त्यांना मी म्हणालो होतो, ‘दावीद तुझ्या घराण्यातील पुरुषच इस्राएलच्या राजपदावर आरुढ होईल.’
19. “पण जर माझ्या आज्ञा आणि नियम तू पाळले नाहीस. इतर दैवतांची उपासना सेवा केलीस,
20. तर मात्र मी दिलेल्या या भूमीतून इस्राएल लोकांना मी हुसकावून लावीन. माझ्या नावाप्रीत्यर्थ असलेले हे पवित्र मंदिर मी सोडून जाईन. इतकेच नव्हे तर ते इतर देशांमध्ये निंदेचा विषय करीन.
21. एकेकाळी पूज्य मानल्या गेलेल्या या मंदिरावरुन जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येकाला आता अश्चर्य वाटेल. ते लोक म्हणतील, ‘हा प्रदेश आणि हे मंदिर यांची अशी अवस्था परमेश्वराने का केली बरे?’
22. तेव्हा त्यांना इतर लोक सांगतील, ‘कारण आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याचे या इस्राएल लोकांनी ऐकले नाही. या लोकांना या परमेश्वरानेच मिसरमधून बाहेर आणले. तरी हे इतर दैवतांच्या भजनी लागले. त्यांनी त्यांची उपासना सेवा केली. त्यांनी मूर्तिपूजा सुरु केली. म्हणून इस्राएल लोकांवर परमेश्वराने हे अरिष्ट आणले.”‘
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×