Bible Books

:

1. परमेश्वर मला म्हणाला, “एक मोठी गुंडाळी घे आणि टाकाने त्यावर पुढील शब्द लिही, ‘महेर-शालाल-हाश-बज.’ (याचा अर्थ- ‘लवकरच येथे लूटालूट चोऱ्या होतील.’)”
2. साक्षीदार म्हणून विश्वास टाकता येईल अशा काही लोकांना मी गोळा केले. (ते होते उरिया हा याजक यबरेख्याचा मुलगा जखऱ्या) त्यांच्या समोरच मी लिहिले.
3. नंतर मी संदेष्ट्रीशी समागम केला. ती गर्भवती होऊन तिला पुत्र झाला. “परमेश्वराने मला त्याचे नाव महेर-शालाल-हाश-बज असे ठेवण्यास सांगितले.
4. कारण तो मुलगा ‘आई-बाबा’ असे बोलायला लागण्यापूर्वीच देव दमास्कसची शोमरोनची सर्व धनसंपत्ती काढून अश्शूरच्या राजाला देईल.”
5. पुन्हा एकदा परमेश्वर माझ्याशी बोलला.
6. माझा प्रभु, म्हणाला, “हे लोक संथ वाहणारे शिलोहाचे पाणी नाकारतात. ते रसीन रमाल्याचा पुत्र (पेकह) यांच्या सहवासात आनंद मानतात.
7. पण मी, परमेश्वर, अश्शूरच्या राजाला त्याच्या सर्व शक्तीनीशी तुमच्यावर आक्रमण करण्यास भाग पाडीन. युफ्राटिस नदीच्या लोंढ्याप्रमाणे ते येतील. पुराचे पाणी चढत जाऊन नदीच्या किनाऱ्यावरून बाहेर ओसंडून वाहते तसेच ते येतील.
8. नदीचा काठ ओलांडून बाहेर पसरलेल्या पाण्याप्रमाणे अश्शूरचे सैन्य सर्व यहुदाभर पसरेल. ते यहुदाच्या गळ्यापर्यंत चढेल जवळजवळ यहुदाला बुडवून टाकील. “इम्मानुएल, हे पुराचे पाणी सर्व देशाला व्यापेपर्यंत पसरत राहील.”
9. सर्व राष्ट्रांनो, युध्दाची तयारी करा, तुम्ही पराभूत व्हाल, दुरवरच्या सर्व देशांनो, ऐका! लढाईची तयारी करा, तुमचा पराभव होईल.
10. लढण्याचे बेत करा, ते सिध्दीस जाणार नाहीत. तुम्ही तुमच्या सैन्याला हुकूम करा, पण त्याचा काहीही उपयोग होणार नाही. का? कारण देव आमच्या पाठीशी आहे.
11. परमेश्वर माझ्याशी त्याच्या महान सामर्थ्यानिशी बोलला ‘मी ह्या लोकांच्या मार्गाने जाऊ नये. असे परमेश्वराने मला बजावले. परमेश्वर म्हणाला,
12. “दुसरे त्यांच्याविरूध्द कट करीत आहेत, असे ते म्हणत आहेत. तू त्या गोष्टींवर विश्वास ठेवू नकोस, ज्या गोष्टींना हे लोक घाबरतात, त्या गोष्टींना घाबरू नकोस. त्या गोष्टींची मुळीच भीती बाळगू नकोस.”
13. सर्वशक्तिमान परमेश्वर हाच असा आहे की त्याचे भय मानावे. त्याचाच फक्त आदर करावा. त्यालाच फक्त पवित्र मानावे.
14. तु जर परमेश्वराचा मान राखलास, तो पवित्र आहे असे मानलेस, तर तो तुला अभय देईल, पण जर तू त्याचा अनादर केलास, तर देव रस्त्यावरील दगडाप्रमाणे होईल आणि तुम्ही लोक त्यावर ठेचकाळून पडाल. इस्राएलच्या दोन घराण्यांना तो दगड अडखळवतो. यरूशलेमच्या सर्व लोकांचा परमेश्वरच सापळा आहे.
15. (पुष्कळ माणसे ह्याच अडथळ्याला अडखळून पडतील त्यांची हाडे मोडतील. ते सापळ्यात अडकतील पकडले जातील.)
16. यशया म्हणाला, “करार करा त्यावर शिक्कामोर्तब करा माझ्या शिकवणुकीचे भविष्यकाळासाठी जतन करा. माझ्या शिष्यांसमोर हे करा.
17. तो करार असा: परमेश्वराने आपल्याला मदत करावी म्हणून मी वाट पाहीन. याकोबच्या वंशजांची परमेश्वराला लाज वाटते. तो त्यांच्याकडे पाहण्याचे नाकारतो. पण मी परमेश्वराची प्रतीक्षा करीन. तो आम्हाला वाचवील.
18. “माझी मुले आणि मी इस्राएल लोकांकरिता निशाणी आणि पुरावे आहोत. सीयोनच्या डोंगरावर राहणाऱ्या सर्वशक्तिमान परमेश्वराने आम्हाला पाठविले आहे.”
19. काही लोक “काय करावे ते ज्योतिषी जादूटोणा करणारे यांना विचारा” असे म्हणतात. (ते ज्योतिषी जादूटोणा करणारे कुजबुजतात आपल्याला गुपित समजते असे लोकांना वाटावे म्हणून पक्षांप्रमाणे बोलतात.) पण मी सांगतो की तुम्ही मदतीसाठी देवाला हाक मारावी. ते ज्योतिषी आणि जादूटोणा करणारे मृतांची मदत घेतात. सजीवांनी मृतांची मदत का घ्यावी?
20. तुम्ही शिकवणुकीप्रमाणे वागा कराराचे पालन करा. तुम्ही ह्या आज्ञांचे पालन केले नाही तर तुम्ही चुकीच्या आज्ञांचे पालन कराल. (चुकीच्या आज्ञा म्हणजे ज्योतिषी जादूटोणा करणारे ह्यांनी दिलेल्या आज्ञा होत. त्या आज्ञांना काही अर्थ नाही. त्या आज्ञांचे पालन करून तुम्हाला काहीही मिळणार नाही.)
21. तुम्ही चुकीच्या आज्ञांचे पालन कराल तर देशावर संकटे येतील आणि उपासमार होईल. लोकांची उपासमार झाल्यावर लोक संतापतील ते राजा आणि त्याचे देव ह्यांच्याविरूध्द बोलू लागतील. मग मदतीसाठी देवाकडे पाहतील.
22. जर त्यांनी त्यांच्या आजूबाजूला पाहिले तर त्यांना संकटे आणि निराशेचा अंधकार दिसेल, बळजबरीने देश सोडून जावे लागणाऱ्या लोकांचे अतीव दु:ख त्यांना दिसेल आणि जे लोक या अंधकारात अडकतील त्यांना आपली सुटका करून घेता येणार नाही.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×