Bible Books

:

1. नंतर ईयोब आपले बोलणे पुढे चालू ठेवत म्हणाला:
2. “खरोखरच देव आहे. आणि तो आहे हे जसे खरे आहे तसेच तो माझ्या बाबतीत अन्यायी होता हे ही खरे आहे. होय, त्या सर्वशक्तिमान देवाने माझे जीवन कडू करुन टाकले.
3. परंतु जोपर्यंत माझ्यात जीव आहे आणि देवाचा जिवंत श्वास माझ्या नाकात आहे तोपर्यंत,
4. माझे ओठ वाईट गोष्टी बोलणार नाहीत आणि माझी जीभ खोटे सांगणार नाही.
5. तुम्ही बरोबर आहात हेही मी कधी मान्य करणार नाही. मी निरपराध आहे हेच मी मरेपर्यंत सांगत राहीन.
6. मी ज्या चांगल्या गोष्टी केल्या त्यांना मी चिकटून राहीन. चांगले वागणे मी कधीही सोडणार नाही. मरेपर्यंत माझे मन मला कधीही खाणार नाही.
7. “लोक माझ्याविरुध्द उभे राहिले. वाईट माणसांना जशी शिक्षा होते तशी माझ्या शत्रूंना व्हावी अशी मी आशा करतो.
8. जर एखादा माणूस देवाला मानत नसेल तर तो मेल्यावर त्याला कसलीच आशा राहाणार नाही. देव त्याचे आयुष्य संपवतो तेव्हा त्याला आशा करायला जागा नसते.
9. त्या दुष्ट माणसावर संकटे येतील आणि तो देवाच्या मदतीसाठी रडेल. पण देव त्याचे ऐकणार नाही.
10. त्याने सर्वशक्तिमान देवाशी बोलून आनंद मिळवायला हवा होता. त्याने नेहमी देवाची प्रार्थना करायला हवी होती.
11. “मी तुम्हाला देवाच्या सामर्थ्याविषयी सांगू शकेन. सर्वशक्तिमान देवाच्या योजना मी तुमच्या पासून लपवणार नाही.
12. तुम्ही देवाचे सामर्थ्य तुमच्या डोळ्यांनी पाहिले आहे. मग तुम्ही असे निरर्थक का बोलता?
13. देवाने वाईट लोकांसाठी हीच योजना आखली होती. आणि सर्वशक्तिमान देवाकडून दुष्टांना हेच मिळाले होते.
14. दुष्ट माणसाला खूप मुले असतील परंतु त्याची मुले लढाईत मरतील. दुष्ट माणसाच्या मुलांना पुरेसे खायला मिळणार नाही.
15. त्याची सर्व मुले मरतील आणि त्याच्या विधवेला दु:ख वाटणार नाही.
16. दुष्ट माणसाला इतकी चांदी मिळेल की ती त्याला मातीमोल वाटेल, त्याला इतके कपडे मिळतील की ते त्याला मातीच्या ढिगाप्रमाणे वाटतील.
17. परंतु चागंल्या माणसाला त्याचे कपडे मिळतील आणि निरपराध्याला त्याची चांदी मिळेल.
18. दुष्ट माणूस घर बांधेल परंतु ते जासत दिवस टिकणार नाही. ते कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे किंवा रखवालदारच्या तंबूप्रमाणे असेल.
19. दुष्ट माणूस झोपी गेल्यावर श्रीमंत होईल. परंतु जेव्हा तो डोळे उघडेल तेव्हा त्याची श्रीमंती नष्ट झालेली असेल.
20. तो घाबरेल, महापुराने आणि वादळाने सर्वकाही वाहून न्यावे तसे होईल.
21. पूर्वेचा वारा त्याला वाहून नेईल आणि तो जाईल. वादळ त्याला त्याच्या घरातून उडवून लावेल.
22. दुष्ट माणूस वादळाच्या शक्तीपासून पळून जाण्याचा प्रयत्न करील परंतु कसलीही दयामाया दाखवता वादळ त्याच्यावर आदळेल.
23. दुष्ट माणूस पळून गेला म्हणून लोक टाळ्या वाजवतील. तो आपल्या घरातून पळून जात असता लोक शिट्या मारतील.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×