Bible Versions
Bible Books

Joshua 7 (IRVMR) Indian Revised Version - Marathi

1 {आखानाचे पातक} PS परंतु इस्राएल लोकांनी समर्पित वस्तूंच्या बाबतीत अपराध केला; यहूदा वंशांतील जेरहाचा मुलगा जब्दी याचा मुलगा कर्मी याचा मुलगा आखान याने समर्पित वस्तूंपैकी काही ठेवून घेतल्या, म्हणून इस्राएल लोकांवर परमेश्वराचा कोप पेटला.
2 बेथेल शहराच्या पूर्वेस बेथ-आवेनाजवळ आय नगर आहे तिकडे यहोशवाने यरीहोहून माणसे पाठवली आणि त्यांना सांगितले की, “जा, तो देश हेरा.” तेव्हा त्यांनी जाऊन आय नगर हेरले,
3 नंतर ते यहोशवाकडे परत येऊन म्हणाले, सर्व लोकांनी तेथे जाऊ नये, “फक्त दोन तीन हजार पुरुषांनी जाऊन आय नगरावर हल्ला करावा; तेथे सर्व लोकांस जाण्याचे कष्ट देण्याची गरज नाही; कारण ते लोक थोडकेच आहेत.”
4 म्हणून लोकांतले सुमारे तीन हजार पुरुष तिकडे रवाना झाले; पण आय येथल्या मनुष्यांपुढे त्यांना पळ काढावा लागला.
5 आय येथील मनुष्यांनी त्यांच्यातली सुमारे छत्तीस माणसे मारून टाकली आणि आपल्या वेशीपासून शबारीमापर्यंत * अर्थ-दगडाची खाण त्यांचा पाठलाग करून उतरणीपर्यंत त्यांना मारीत नेले; आणि त्यामुळे लोक घाबरले आणि त्यांचे धैर्य खचले.
6 यहोशवाने आपले कपडे फाडले आणि तो इस्राएलाचे वडील संध्याकाळपर्यंत परमेश्वराच्या कराराच्या कोशापुढे आपल्या डोक्यात धूळ घालून आणि पालथे पडून राहिले.
7 मग यहोशवा म्हणाला, हायहाय! “हे प्रभू परमेश्वरा; तू या सर्व लोकांस यार्देन ओलांडून का आणले? अमोऱ्यांच्या हाती देऊन आमचा नाश करण्यासाठी आणलेस का? आम्ही समाधानी होऊन यार्देनेच्या पलीकडे राहिलो असतो तर किती बरे होते!
8 हे प्रभू, इस्राएलाने आपल्या शत्रूंना पाठ दाखविली; आता मी काय बोलू?
9 कारण कनानी लोक आणि देशातले सर्व रहिवासी हे ऐकून आम्हांला घेरतील आणि पृथ्वीवरच्या लोकांस आमचे नाव विसरावयास लावतील. तेव्हा तू आपल्या महान नावासाठी काय करणार आहेस?”
10 तेव्हा परमेश्वर यहोशवाला म्हणाला, ऊठ, असा पालथा का पडलास?
11 इस्राएलाने पाप केले आहे; मी त्यांच्याशी केलेला कराराचा त्यांनी भंग केला आहे; समर्पित वस्तूंपैकी काही त्यांनी घेतल्या आहेत; एवढेच नव्हे तर त्यांनी चोरी लबाडीही केली आहे, आणि त्या वस्तू आपल्या सामानामध्ये ठेवल्या आहेत.
12 त्याचा परिणाम म्हणून इस्राएल लोक आपल्या शत्रूंपुढे टिकाव धरत नाहीत, ते आपल्या शत्रूंना पाठ दाखवितात, कारण ते शापित झाले आहेत; तुमच्यामधून त्या समर्पित वस्तू नाश केल्याशिवाय येथून पुढे मी तुमच्यामध्ये राहणार नाही.
13 तर उठ, लोकांस पवित्र कर, त्यांना सांग उद्यासाठी स्वतःला पवित्र करा, कारण इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो, “हे इस्राएला, तुझ्यामध्ये समर्पित वस्तू अजून आहेत, तुमच्यामधून त्या समर्पित वस्तू तुम्ही दूर करून त्यांचा नाश करा. त्या तुमच्यातून काढून त्यांचा सर्वनाश करीपर्यंत शत्रूपुढे तुमचा टिकाव लागणार नाही.”
14 सकाळी तुम्ही आपआपल्या वंशाप्रमाणे हजर राहा. मग ज्या वंशाला परमेश्वर पकडील त्या वंशाच्या एकाएका घराण्याने पुढे यावे; मग ज्या घराण्याला परमेश्वर पकडील त्या घराण्यातील एकाएका पुरुषाने पुढे यावे;
15 ज्याच्याजवळ समर्पित वस्तू सापडतील त्यास त्याच्या सर्वस्वासह अग्नीने जाळून त्याचा नाश करावा. कारण त्याने परमेश्वराचा करार मोडला आहे, आणि इस्राएलमध्ये मूढपणाचे काम केले आहे.
16 यहोशवाने मोठ्या पहाटेस उठून इस्राएलाचा एकएक वंश समोर आणला, आणि यहूदा वंश पकडला गेला.
17 मग त्याने यहूदाची कुळे जवळ आणली, तेव्हा जेरह कूळ पकडले गेले. आणि जेरहाच्या कुळातले एकएक घराणे समोर आणण्यात आले तेव्हा जब्दीला पकडण्यात आले.
18 मग त्या घराण्यातील एकएका पुरुषास जवळ आणले तेव्हा यहूदा वंशातील जेरहाचा मुलगा जब्दी याचा मुलगा कर्मी याचा मुलगा आखान हा पकडला गेला.
19 तेव्हा यहोशवा आखानाला म्हणाला, “माझ्या मुला, इस्राएलाचा देव परमेश्वर याला गौरव दे आणि तुझ्या गुन्ह्यांची कबुली कर; कृपा करून तू काय केले ते आता मला सांग; माझ्यापासून काही लपवू नको.”
20 आखानाने यहोशवाला उत्तर दिले की, “मी खरोखर इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्या विरुद्ध पाप केले आहे; आणि मी जे केले ते हे:
21 लुटीमध्ये एक सुंदर शिनारी झगा, दोनशे शेकेल रुपे आणि सोन्याची पन्नास शेकेल वजनाची एक वीट या वस्तू मला दिसल्या तेव्हा मला त्या घेण्याची इच्छा झाली. माझ्या डेऱ्यामध्ये त्या जमिनीत पुरलेल्या आहेत आणि रुपे त्याच्या खाली आहे.”
22 तेव्हा यहोशवाने दूत पाठवले. ते तंबूकडे धावत गेले, आणि पाहा, त्याच्या तंबूत त्या वस्तू लपवलेल्या होत्या त्याच्या खाली रुपे होते.
23 त्याने त्या तंबूतून काढून यहोशवा आणि सर्व इस्राएल लोक यांच्याकडे आणून परमेश्वरासमोर ठेवल्या.
24 त्यानंतर यहोशवाने त्यासोबतच्या सर्व इस्राएल लोकांनी जेरहाचा पुत्र आखान याला त्याच्याबरोबर ते रुपे, तो झगा ती सोन्याची वीट, त्याची मुले त्याच्या मुली, त्याचे बैल, गाढवे, शेरडेमेंढरांचे कळप, त्याचा तंबू त्याचे जे काही होते नव्हते ते सर्व अखोरच्या खोऱ्यात नेले.
25 यहोशवा म्हणाला, “तू आम्हांला का त्रास दिलास? परमेश्वर तुला आज त्रास देईल.” मग सर्व इस्राएलांनी त्यास दगडमार केला ती सर्व अग्नीने जाळून वर दगड टाकले.
26 त्यावर त्यांनी एक मोठी दगडांची रास केली; ती आजपर्यंत तेथे आहे. मग परमेश्वराचा भडकलेला राग शांत झाला. यावरुन त्या स्थळाला आजपर्यंत अखोरचे अर्थ-त्रास देणारे खोरे असे म्हणतात. PE
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×