Bible Versions
Bible Books

2 Samuel 1 (IRVMR) Indian Revised Version - Marathi

1 {शौलाच्या मृत्यूची बातमी दाविदाला कळते} PS शौलाच्या मृत्यूनंतर, अमालेक्यांचा संहार करून दावीद सिकलाग नगरात येऊन दोन दिवस राहिल्यानंतर,
2 तिसऱ्या दिवशी, तेथे एक तरुण सैनिक आला. तो शौलाच्या छावणीतील होता. त्याचे कपडे फाटलेले आणि डोके धुळीने माखलेले होते. त्याने सरळ दावीदाजवळ येऊन लोटांगण घातले.
3 दावीदाने त्यास विचारले, “तू कोठून आलास?” आपण नुकतेच इस्राएलांच्या छावणीतून आल्याचे त्याने सांगितले.
4 तेव्हा दावीद त्यास म्हणाला, “मग युध्दात कोणाची सरशी झाली ते सांग बरे. तो म्हणाला, लोकांनी लढाईतून पळ काढला. बरेच जण युध्दात मरण पावले शौल आणि त्याचा मुलगा योनाथान दोघेही प्राणाला मुकले.”
5 दावीद त्या तरुणाला म्हणाला, “शौल त्याचा पुत्र योनाथान हेही मरण पावले आहेत हे तुला कसे कळले?”
6 यावर तो तरुण सैनिक म्हणाला, “योगायोगाने मी गिलबोवाच्या डोंगरावरच होतो. तिथे शौल आपल्या भाल्यावर पडलेला मला दिसला. पलिष्ट्यांचे रथ आणि घोडेस्वार त्याच्या अगदी नजीक येऊन ठेपले होते.
7 शौलाने मागे वळून पाहिले तेव्हा त्यास मी दिसलो त्याने मला बोलावले आणि मी त्याच्याजवळ गेलो.
8 त्याने माझी चौकशी केली मी अमालेकी असल्याचे त्यास सांगितले.
9 तेव्हा शौल म्हणाला, ‘मला अत्यंत दुखापत झाली आहे. तेव्हा मला मारून टाक. कारण मी मरणाच्या दाराशी उभा आहे.’
10 त्याची जखमी अवस्था पाहता तो वाचणार नाही हे दिसतच होते, तेव्हा मी त्याचा वध केला. मग त्याचा मुकुट आणि दंडावरचे आभूषण काढून घेतले. स्वामी महाराज, त्याच वस्तू येथे तुमच्यासाठी मी आणल्या आहेत.”
11 हे ऐकून दावीदाला इतके दुःख झाले की त्या भरात त्याने आपले कपडे फाडले. त्याच्या सोबतच्या लोकांनीही त्याच्या सारखेच केले.
12 दुःखाने त्यांनी आक्रोश केला. संध्याकाळपर्यंत त्यांनी काही खाल्ले नाही. शौल, त्याचा मुलगा योनाथान त्याचप्रमाणे परमेश्वराचे लोक म्हणजे इस्राएलाचे लोक युद्धात मृत्युमुखी पडले याबद्दल त्यांनी शोक केला.
13 शौलाच्या मृत्युची बातमी आणणाऱ्या त्या तरुण सैनिकाला दावीदाने विचारले, “तू कुठला?” यावर तो म्हणाला, “मी अमालेकी असून एका परदेशी मनुष्याचा मुलगा आहे.”
14 दावीदाने त्यास विचारले, “परमेश्वराने निवडलेल्या राजाचा वध करताना तुला भीती कशी वाटली नाही?”
15 मग दावीदाने आपल्या एका तरुण सेवकाला बोलावून त्या अमालेक्याचा वध करण्यास फर्मावले. त्याप्रमाणे त्या इस्राएली तरूणाने अमालेक्याला मारले.
16 दावीद त्यास म्हणाला, “तुझ्या मृत्यूला तूच जबाबदार आहेस. परमेश्वराच्या अभिषिक्त राजाला आपण मारले असे तू बोलून चुकला आहेस तू अपराधी आहेस. याची तूच आपल्या तोंडाने साक्ष दिली आहेस.” PS
17 {शौल योनाथानासाठी दावीद शोक करतो} PS शौल आणि त्याचा पुत्र योनाथान यांना उद्देशून दावीदाने एक विलापगीत म्हटले.
18 त्याने यहूद्यांना एक शोकगीत शिकवायला सांगितले हे शोकगीत धनुर्विलाप या नावाने ओळखले जाते. याशारच्या पुस्तकात हे गीत लिहिलेले आहे.
19 “हे इस्राएला, तुझे सौंदर्य तुझ्या डोंगरावर नष्ट झाले. पाहा, हे शूर कसे धारातीर्थी पडले!
20 ही बातमी गथमध्ये सांगू नका. अष्कलोनच्या रस्त्यांवर जाहीर करू नका. नाही तर, पलिष्ट्यांच्या त्या कन्या आनंदीत होतील. नाहीतर बेसुंत्याच्या त्या मुलींना आनंद होईल.
21 गिलबोवाच्या डोंगरावर पाऊस किंवा दव पडो! तिथल्या शेतातून अर्पण करण्यापुरतेही काही उगवो! कारण शूरांच्या ढालींना तिथे गंज चढला. शौलाची ढाल तेल-पाण्यावाचून तशीच पडली.
22 योनाथानाच्या धनुष्याने आपल्या वाटच्या शत्रुंचे पारिपत्य केले. शौलाच्या तलवारीने ही आपले बळी घेतले. रक्ताचे पाट वाहवून त्यांनी लोकांस वधिले, बलाढ्यांची हत्या केली.
23 शौल आणि योनाथान यांनी आयुष्यभर परस्परांवर प्रेम केले. एकमेकांना आनंद दिला मृत्यूनेही त्यांची ताटातूट केली नाही. गरुडांहून ते वेगवान आणि सिंहापेक्षा बलवान् होते!
24 इस्राएली कन्यांनो, शौलासाठी शोक करा. किरमिजी वस्त्रे त्याने तुम्हास दिली वस्त्रांवरचे सोन्याचे जरीकाम त्याने दिले.
25 युध्दात शूर पुरुष कामी आले. गिलबोवाच्या डोंगरावर योनाथानाला मरण आले.
26 बंधू योनाथान, मी अतिशय दुःखी असून तुझ्यासाठी फार अस्वस्थ आहे. तुझ्या सहवासाचा लाभ मला मिळाला. स्त्रियांच्या प्रेमापेक्षाही तुझे माझ्यावरील प्रेम अधिक होते.
27 या युध्दात पराक्रमी पुरुषांचे पतन झाले त्यांची शस्त्रे नष्ट झाली.” PE
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×