Bible Books

:

1. {दावीद आणि बथशेबा} PS वसंत ऋतूमध्ये ज्यावेळी राजे युध्द मोहिमांवर जातात त्यावेळी दावीदाने यवाबाला सर्व नोकरा चाकरांचा लवाजमा आणि समस्त इस्राएलांना अम्मोन्यांच्या संहारासाठी पाठवले. यवाबाच्या सैन्याने अम्मोन्यांच्या राब्बा या राजधानीच्या शहराला वेढा घातला दावीद मात्र यरूशलेम येथेच राहिला.
2. संध्याकाळी तो आपल्या पलगांवरून उठला, आणि राजमहालाच्या छतावरून फिरु लागला. तिथून त्यास एक स्त्री स्नान करताना दिसली. ती अतिशय रुपवान होती.
3. तेव्हा दावीदाने आपल्या सेवकवर्गाला बोलवून तिची माहिती काढली सेवकाने सांगितले ती अलीयमची मुलगी बथशेबा, उरीया हित्ती याची पत्नी आहे.
4. तिला आपल्याकडे घेऊन यायला दावीदाने निरोप्याला पाठवले. ती आल्यावर दावीदाने तिच्याशी शरीरसंबंध केला, नंतर स्नान करून शुध्द होऊन ती पुन्हा आपल्या घरी परतली.
5. पण बथशेबा गर्भवती राहिली दावीदाला तिने निरोप पाठवला तिने सांगितले, मी गरोदर आहे.
6. दावीदाने यवाबाला निरोप पाठवला की, उरीया हित्तीला माझ्याकडे पाठवा. तेव्हा यवाबाने उरीया हित्तीला दावीदाकडे पाठवले.
7. उरीया आल्यावर दावीद त्याच्याशी बोलला. उरीयाला त्याने यवाब, सर्व सैन्य, लढाई यांचे वर्तमान विचारले.
8. मग दावीद उरीयाला म्हणाला, घरी जा आणि आराम कर उरीया महालातून बाहेर पडला त्यानंतर त्याच्यासाठी राजातर्फे भेट पाठवण्यात आली.
9. पण उरीया घरी गेला नाही. तो महालाच्या बाहेरच दाराशी झोपून राहिला. राजाच्या सेवक वर्गाप्रमाणेच तो तिथे झोपला.
10. उरीया घरी परतला नसल्याचे सेवकांनी दावीदाला सांगितले. तेव्हा दावीद उरीयाला म्हणाला, तू लांबून प्रवास करून आला आहेस, तर तू घरी का गेला नाहीस?
11. उरीया दावीदाला म्हणाला, पवित्र कराराचा कोश, इस्राएलचे सैनिक, आणि यहूदा हे राहुट्यांमध्ये राहत आहेत. माझा धनी यवाब आणि महाराजांचे (दावीदाचे) सेवक ही खुल्या मैदानात तळ देऊन आहेत. अशावेळी मीच तेवढे घरी जाऊन खाणेपिणे करणे आणि पत्नीच्या सहवासात झोपणे योग्य होणार नाही.
12. दावीद उरीयाला म्हणाला, आजच्या दिवस इथे राहा उद्या मी तुला युध्दभूमीवर पाठवतो. उरीयाने त्या दिवशी यरूशलेमेमध्येच मुक्काम केला.
13. दुसऱ्या दिवशी सकाळी दावीदाने त्यास भेटायला बोलावले. दावीदाबरोबर उरीयाने भोजन केले. दावीदाने त्यास बेहोश होईपर्यंत मद्य पाजले पण तरी उरीया घरी गेला नाही. त्या संध्याकाळीसुद्धा तो राजाच्या सेवकांबरोबरच महालाच्या दाराशी झोपायला गेला.
14. दुसऱ्या दिवशी सकाळी दावीदाने यवाबासाठी एक पत्र लिहून ते उरीयाला न्यायला सांगितले.
15. त्या पत्रात दावीदाने लिहिले होते, आघाडीवर जेथे तुंबळ युध्द चालले असेल, तेथे उरीयाला पाठवा. त्यास एकट्याला तेथे सोडा, म्हणजे तो युध्दात कामी येईल.
16. यवाबाने नगराची टेहेळणी करून सर्वात लढवय्ये अम्मोनी कोठे आहेत ते पाहिले, आणि उरीयाला तेथे नेमले.
17. राब्बा नगरातील लोक यवाब विरूद्ध चालून आले. दावीदाची काही माणसे मारली गेली उरीया हित्ती हा त्यापैकी एक होता.
18. नंतर यवाबाने युध्दातील हकिकतीचे सविस्तरवृत्त संदेशवाहकाद्वारे दावीदाला पाठवले.
19. युध्दात जे जे झाले ते सर्व सांगायला त्याने आपल्या नोकराला सांगितले.
20. यवाब सेवकाला म्हणाला, कदाचित राजा संतापून म्हणेल यवाबाचे सैन्य नगराच्या इतके जवळ भिडले कसे? शत्रू तटाच्या भिंतीवरून शिरसंधान करतील हे त्यास ठाऊक असायला हवे.
21. तेबेसमध्ये यरुब्बेशेथाचा पुत्र अबीमलेख याला एका स्त्रीने मारले हे आठवते ना? तिने तटबंदीवरून जात्याची तळी उचलून अबीमलेखवर टाकली. असे असताना हा इतक्या जवळ का गेला? राजा दावीद असे काही म्हणाला, तर त्यास हे ही म्हणावे की, उरीया हित्ती हा तुमचा सेवकही यामध्ये मारला गेला.
22. निरोप्याने दावीदाकडे जाऊन यवाबाने जे जे सांगायला सांगितले ते सर्व कथन केले.
23. तो म्हणाला, अम्मोन्यांनी आमच्यावर मैदानात हल्ला केला आम्ही त्यांचा सामना करून त्यांना नगराच्या वेशीपर्यंत पळवून लावले.
24. मग तटबंदीवरील काही लोकांनी आपल्या शिपायांवर बाणांचा वर्षाव केला त्यामध्ये काही जण ठार झाले उरीया हित्ती हा तुमचा सेवकही प्राणाला मुकला.
25. दावीद त्या निरोप्याला म्हणाला, यवाबाला सांग निराश होऊ नको. हिम्मत सोडू नको. तलवारीने कोणाचाही संहार होऊ शकतो. राब्बावर आणखी जोरदार हल्ला चढवा, तुम्ही जिंकाल. यवाबाला माझा हा निरोप सांगून प्रोत्साहन दे.
26. उरीया मरण पावल्याचे बथशेबाला कळले तिने पतिनिधनाबद्दल शोक केला.
27. काही काळाने तिचे दुःख ओसरल्यावर दावीदाने सेवकाकरवी तिला आपल्याकडे आणले. ती त्याची पत्नी झाली आणि त्याच्या पुत्राला तिने जन्म दिला. पण दावीदाचे हे नीच कृत्य परमेश्वरास पसंत पडले नाही. PE
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×