Bible Books

:

1. डोंगरमाथ्याच्या थोडे पुढे गेल्यावर, मफीबोशेथाचा सेवक सीबा दावीदाला भेटला. सीबाजवळ खोगीर घातलेली दोन गाढवे होती दोनशे भाकरी, किसमिसाचे शंभर घड, अंजिरांच्या शंभर ढेपा आणि द्राक्षरसाचा बुधला एवढे सामान गाढवांवर लादलेले होते.
2. राजा दावीदाने “हे सर्व कशासाठी? म्हणून सीबाला विचारले सीबा म्हणाला,” “राजाच्या कुटुंबियांना बसण्यासाठी म्हणून ही गाढवे आहेत, भाकरी आणि फळे नोकरांना खाण्यासाठी आणि वाळवंटात चालून थकलेल्यांसाठी हा द्राक्षरस आहे.”
3. राजाने त्यास मफिबोशेथाचा ठावठिकाणा विचारला सीबाने सांगितले, मफिबोशेथ यरूशलेमेमध्येच आहे. कारण आता माझ्या आजोबांचे राज्य मला इस्राएली परत देतील असे त्यास वाटते.
4. तेव्हा राजा सीबाला म्हणाला ठीक आहे, जे जे मफीबोशेथच्या मालकीचे होते ते मी आता तुला देत आहे. सीबा म्हणाला, मी आपल्याला नमन करतो. मी तुम्हास आनंद देण्यास समर्थ होईन अशी मी आशा करतो.
5. पुढे दावीद बहूरीमला आला. तेव्हा शौलाच्या घराण्यातील एकजण बाहेर आला. हा गेराचा मुलगा शिमी होता. तो दावीदाला शिव्याशाप देत चालला होता.
6. त्याने दावीदावर आणि त्याच्या सेवकांवर दगडफेक करायला सुरवात केली. पण इतर लोकांनी आणि सैनिकांनी चहूकडून दावीदाला वेढा घातला.
7. शिमी दाविदला शाप देतच होता, चालता हो इथून, तू दुष्ट आहेस तू खूनी आहेस!
8. देव तुला शासन करीत आहे. कारण शौलाच्या घरातील लोकांस तू मारलेस. त्याचे राज्य बळकावलेस. पण ते राज्य परमेश्वराने तुझा मुलगा अबशालोम याच्या हवाली केले आहे. तुझे आता हाल होत आहेत कारण तू खुनी आहेस.
9. सरुवेचा मुलगा अबीशय राजाला म्हणाला, “या मरण पावलेल्या कुत्र्यासारख्या मनुष्याने तुम्हास शिव्याशाप द्यावेत म्हणजे काय? स्वामी, मला त्याचा शिरच्छेद करू द्या.
10. पण राजा त्यास म्हणाला, सरुवेच्या पुत्रांनो मी काय करू? दाविदाला शिव्याशाप दे असे परमेश्वरानेच त्यास सांगितले असेल. मग त्यास असे कोण म्हणू शकेल की, तू राजाला का शाप देत आहेस?”
11. अबीशयला आणि इतर सर्व सेवकांना राजा पुढे म्हणाला, माझा पोटचा मुलगा अबशालोमच माझ्या जिवावर उठला आहे, तर हा बन्यामिनी हे असे करत आहे तर त्यामध्ये नवल काय. त्यास हवे ते म्हणू द्या, कारण परमेश्वरानेच त्यास सांगितले असेल.
12. माझ्याबाबतीत घडणारे हे अन्याय कदाचित् परमेश्वर पाहील, आणि शिमीच्या या शिव्याशापाच्या बदल्यात उद्या तो माझे भलेच करील.
13. दावीद आणि त्याच्या बरोबरचे लोक मग आपल्या वाटेने तसेच पुढे गेले. शिमी त्यांच्या मागोमाग जात राहिला. डोंगराच्या कडेने तो दुसऱ्या बाजूने जात होता. तो दाविदाबद्दल खूप वाईट गोष्टी बोलत होता. दावीदावर तो दगड आणि मातीही फेकत होता.
14. राजा दावीद आणि बरोबरचे सर्व लोक यार्देन नदीजवळ आले. दमल्यामुळे ते तेथे विश्रांतीला थांबले. त्यांनी विसावा घेतला ते ताजेतवाने झाले.
15. अबशालोम, अहिथोफेल आणि इस्राएलचे सर्व लोक यरूशलेम येथे आले.
16. दावीदाचा मित्र अर्की हूशय अबशालोमकडे आला आणि त्याने अबशालोमची स्तुती केली. तो म्हणाला, राजा चिरायु होवो, राजा चिरायु होवो.
17. अबशालोम त्यास म्हणाला, हीच का तुझ्या मित्रावरील तुझी प्रीती? तू ही त्याच्याबरोबर यरूशलेम का सोडले नाहीस?
18. हूशय अबशालोमाला म्हणाला, परमेश्वर ज्याची निवड करेल त्यास माझा पाठिंबा आहे. परमेश्वराने आणि इस्राएल लोकांनी आपली निवड केली आहे. म्हणून मी तुमच्या बाजूचा आहे.
19. पूर्वी मी तुमच्या वडीलांच्या सेवेत होतो, आता तशीच तुमची सेवा करणार.
20. अबशालोमने अहिथोफेलला विचारले आम्ही काय करावे ते सांग.
21. अहिथोफेल त्यास म्हणाला, मंदीराची राखण करायला तुझ्या वडीलांनी त्यांच्या उपपत्नी येथेच ठेवल्या आहेत. त्यांच्याशी तू संबंध ठेव मग तुझ्या वडीलांना तुझा तिरस्कार वाटेल ही गोष्ट सर्व इस्राएलांमध्ये पसरेल. त्यामुळे त्या सर्वांचा तुला पाठिंबा मिळेल.
22. मग सर्वांनी राजवाड्याच्या धाब्यावर अबशालोमसाठी राहुटी ठोकली. अबशालोमने आपल्या वडीलांच्या उपपत्नीशी लैंगिक सबंध ठेवले. ही गोष्ट सर्व इस्राएलांनी पाहिली.
23. अहिथोफेलचा सल्ला दावीद आणि अबशालोम या दोघांनाही उपयोगी पडला. लोकांस त्याचे म्हणणे देवाच्या शब्दा इतके महत्वाचे वाटत. PE
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×