Bible Books

:

1. {पलिष्टी कोश परत करतात} PS आता परमेश्वराचा कोश पलिष्ट्यांच्या देशात सात महिने राहिला.
2. आणि मग, पलिष्ट्यांनी याजकांना ज्योतिष्यांना बोलावून त्याने म्हटले, “परमेश्वराच्या कोशाचे आम्ही काय करावे? तो त्याच्या ठिकाणी कसा पाठवावा हे आम्हास सांगा.”
3. ते म्हणाले, “तुम्ही इस्राएलाच्या देवाचा कोश माघारी पाठवाल तर तो अर्पणांच्या भेटींशिवाय पाठवू नका; तर त्याबरोबर दोषार्पण अवश्य पाठवावे. मगच तुम्ही निरोगी व्हाल, आणि त्याचा हात तुम्हावरून अद्यापपर्यंत का दूर होत नाही हे तुम्हास समजेल.”
4. तेव्हा ते म्हणाले, “जे दोषार्पण त्याबरोबर आम्ही पाठवावे ते काय असावे?” त्यांनी उत्तर दिले, “पलिष्ट्यांचा सरदारांच्या संख्येप्रमाणे पाच सोन्याच्या गाठी पांच सोन्याचे उंदीर; कारण तुम्हा सर्वांवर तुमच्या अधिकाऱ्यांवर एकच पीडा आली आहे.
5. म्हणून तुम्ही तुमच्या गाठीच्या आकाराची तुमचे जे उंदीर शेताचा नाश करतात त्याच्या प्रतिकृती तयार करा आणि तुम्ही इस्राएलाच्या देवाचा गौरव करा कदाचित तो आपला हात तुम्हावरून, तुमच्या देवावरून, तुमच्या भूमीवरून काढेल.
6. मिसरी लोक फारो यांनी जशी आपली मने कठीण केली तशी तुम्ही आपली मने कशाला कठीण करता? जेव्हा तो त्यांच्याशी कठोरपणे वागला आणि त्याने त्यांना जाऊ देण्याची परवानगी दिली नाही, परंतु नंतर ते निघून गेले नाहीत काय?
7. तर तुम्ही एक नवी गाडी तयार करा आणि ज्यांच्या वर कधी जू ठेवले नाही अशा दोन दुभत्या गायी घेऊन गाडीला जुंपा त्यांची वासरे त्यांच्यापासून वेगळी करून घरी आणा.
8. मग परमेश्वराचा कोश घेऊन गाडीवर ठेवा. आणि तुम्ही दोषार्पण म्हणून ज्या सोन्याच्या प्रतीकृती डब्यात घालून त्याच्या एकाबाजूला ठेवा. त्यानंतर, ती गाडी परत पाठवून द्या आणि तिच्या मार्गाने तिला जाऊ द्या.
9. आणि पाहा, बेथ-शेमेशाकडे त्याच्या मार्गाने तो गेला, तर ज्याने आम्हावर हे मोठे अरिष्ट लावले आहे तो परमेश्वरच आहे हे जाणा; त्याउलट, जर गेला नाही, तर जे आम्हासोबत घडले ती आकस्मित घटना आहे असे आम्ही समजू.”
10. मग त्या मनुष्यांनी तसे केले, म्हणजे, त्यांनी दोन दुभत्या गायी घेऊन गाडीला जुंपल्या आणि त्यांची वासरे घरी बांधून ठेवली.
11. मग त्यांनी परमेश्वराचा कोश आणि त्याच्याबरोबर तो डब्बा सोन्याचे उंदीर त्यांच्या गाठीच्या प्रतिकृती गाडीत ठेवल्या.
12. मग त्या गायी नीट वाट धरून बेथ-शेमेशाच्या रस्त्याने गेल्या; मार्गाने जाताना त्या मोठ्याने हंबरत चालल्या उजवीकडे किंवा डावीकडे फिरल्या नाहीत. आणि पलिष्ट्यांचे अधिकारी बेथ-शेमेशाच्या सीमेपर्यंत त्यांच्यामागे गेले.
13. तेव्हा बेथ-शेमेशाचे शेतकरी खोऱ्यात आपल्या गव्हाची कापणी करीत होते; आणि त्यांनी आपली दृष्टी वर करून कोश पाहिला, तेव्हा तो पाहून ते आनंद पावले.
14. मग गाडी यहोशवा बेथ-शेमेशकर याच्या शेतात येऊन जेथे एक मोठा दगड होता तेथे उभी राहिली. मग, त्यांनी गाडीची लाकडे तोडली आणि त्या गायी परमेश्वरास होमार्पण अशा अर्पण केल्या.
15. लेव्यांनी देवाचा कोश, त्याबरोबर ज्यात सोन्याच्या प्रतिमा होत्या तो डबा, हे उतरवून त्या मोठ्या दगडावर ठेवले. बेथ-शेमेशाच्या मनुष्यांनी त्या दिवशी परमेश्वरास होमार्पणे यज्ञ अर्पण केले.
16. आणि हे पाहिल्यानंतर पलिष्ट्यांचे पांच सरदार त्याच दिवशी एक्रोनास परत गेले.
17. परमेश्वरास पलिष्ट्यांनी ज्या सोन्याच्या गाठी दोषार्पण म्हणून पाठवल्या त्या अशा: अश्दोदकरता एक, गज्जाकरता एक, अष्कलोनाकरता एक, गथकरता एक, एक्रोनाकरता एक.
18. आणि जो मोठा दगड ज्यावर त्यांनी परमेश्वराचा कोश ठेवला तेथपर्यंत पलिष्ट्यांची जी नगरे, म्हणजे तटबंदीची नगरे खेडीपाडीही, ज्या पांच सरदांराची होती, त्यांच्या संख्येप्रमाणे ते सोन्याचे उंदीर होते. तो दगड आजपर्यंत यहोशवा बेथ-शेमेशकर यांच्या शेतात आहे.
19. मग परमेश्वराने काही बेथ-शेमेशकर मनुष्यांना मारले कारण त्यांनी परमेश्वराच्या कोशाच्या आत पाहिले होते. त्याने सत्तर जण मारले. परमेश्वराने लोकांस फार मोठा तडाखा दिला, त्यामुळे लोकांनी शोक केला.
20. तेव्हा बेथ-शेमेशाची माणसे बोलली, “पवित्र परमेश्वर याच्यासमोर कोणाच्याने उभे राहवेल? त्याने आम्हापासून वरती कोणाकडे जावे?”
21. मग त्यांनी किर्याथ-यारीमाच्या रहिवाशांकडे दूत पाठवून म्हटले, की, “पलिष्ट्यांनी परमेश्वराचा कोश माघारी आणला आहे; तुम्ही खाली येऊन तो आपणाकडे वरती न्या.” PE
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×