Bible Books

:

1. {इस्त्राएलाच्या मेंढपाळांविषयी भविष्य} PS मग परमेश्वराचे वचन मजकडे आले आणि म्हणाले,
2. “मानवाच्या मुला, इस्राएलाच्या मेंढपाळाविरूद्ध भविष्य सांग! भविष्य सांग आणि त्यांना म्हण, प्रभू परमेश्वर मेंढपाळाविषयी असे म्हणतो, जे इस्राएलाचे मेंढपाळ स्वत:च चरत आहेत त्यास धिक्कार असो! मेंढपाळाने आपल्या कळपाची काळजी घ्यायला नको का?
3. तुम्ही चरबी खाता आणि लोकरीचे कपडे घालता. तुम्ही कळपातील धष्टपुष्ट मेंढ्या मारता. पण तुम्ही मेंढरांना कधीच चारत नाही.
4. जे कोणी दुर्बळ होते त्यांना तुम्ही सबळ केले नाही किंवा तुम्ही आजाऱ्यांना बरे केले नाही. तुम्ही जे कोणी मोडले त्यांना पट्टी बांधली नाही. आणि जे घालवून दिलेले त्यास परत आणले नाही किंवा हरवलेल्यास शोधत नाही. त्याऐवजी तुम्ही त्यांच्यावर सक्तीने जुलमाने राज्य करता.
5. मग मेंढपाळ नसल्याने त्यांची पांगापांग झाली आणि त्यांची पांगापाग झाल्यानंतर ते रानातील सर्व जिवंत पशूंचे भक्ष्य बनले.
6. माझा कळप सर्व डोंगरांतून प्रत्येक उंच टेकड्यांवरुन भटकून गेली, पृथ्वीच्या सर्व पाठीवर पांगविली गेली. तरी त्यांना शोधण्यास कोणीही नव्हते.
7. म्हणून, मेंढपाळांनो, परमेश्वराचे म्हणणे ऐका.
8. प्रभू परमेश्वर असे म्हणतो, जसा मी जिवंत आहे; माझी मेंढरे लुटीस गेली आहेत; कारण तेथे त्यांना मेंढपाळ नव्हता ती वनपशूस भक्ष्य झाली आणि माझ्या मेंढपाळांनी कोणीही कळपाला शोधले नाही परंतु मेंढपाळाने स्वतःची काळजी घेतली आणि माझ्या कळपाला चारले नाही.
9. तेव्हा, मेंढपाळांनो, परमेश्वराचे म्हणणे ऐका.
10. प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पाहा! मी मेंढपाळांच्याविरूद्ध आहे आणि मी माझी मेंढरे त्यांच्या हातातून मागेन. त्यांचे कळप पाळणे मी बंद करीन; मग मेंढपाळ आपणास पुढे पोसणार नाहीत आणि मी आपली मेंढरे त्यांच्यामुखातून सोडवीन, अशासाठी की, माझी मेंढरे त्यांची भक्ष्य अशी होऊ नयेत.
11. कारण प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पाहा! मी स्वत:च आपल्या कळपाचा शोध घेईन आणि मी त्यांची काळजी घेईन,
12. जो मेंढपाळ आपल्या पांगलेल्या मेंढ्यांबरोबर राहून त्यास शोधतो, तसाच मी आपली मेंढरे शोधीन आणि आभाळाच्या अंधकाराच्या दिवशी त्यांची पांगापाग झाली त्या सर्व ठिकाणाहून मी त्यांना सोडवीन.
13. मग मी त्यांना लोकांतून काढून आणीन. देशातून त्यांना एकत्र करीन त्यांना त्यांच्या भूमीत परत आणीन. मी त्यांना इस्राएलाच्या पर्वताच्याबाजूला, झऱ्यांकाठी आणि लोक राहत असलेल्या सर्व ठिकाणी कुरणात चारीन.
14. मी त्यांना चांगल्या कुरणांत ठेवीन. त्यांचे कुरण इस्राएलाच्या डोंगरावरील उंच ठिकाणी होईल; तेथे ती चांगल्या कुरणात पहुडतील. इस्राएलाच्या डोंगरावर ती उत्तम हिरवळीवर त्या चरतील.
15. मी स्वतः माझा कळप चारीन त्यांना विश्रांती देईन, असे प्रभू परमेश्वर, म्हणतो.
16. हरवलेल्या मेंढ्यांचा मी शोध घेईन भटकलेल्यांना मी परत आणीन. जे मोडलेले त्यास मी पट्टी बांधीन आणि रोगी मेंढीस बरे करीन. मी पुष्ट बलिष्ट यांना नामशेष करीन. त्यास मी यथान्याय चारीन.
17. आणि प्रभू परमेश्वर, असे म्हणतो, तू माझ्या कळपा, पाहा, मी मेंढरामेंढरामध्ये, एडका बोकड ह्यांच्यात न्यायनिवाडा करीन.
18. तुम्ही चांगले कुरण खाऊन टाकता उरलेले कुरण तुम्ही आपल्या पायांनी तुडवता आणि तुम्ही स्वच्छ पाणी पिऊन राहिलेले पायांनी गढूळ करता. हे काहीच नाही असे तुम्हास वाटते का?
19. पण माझी मेंढरे आता तुमच्या पावलांनी, चिरडलेले गवत खातात आणि तुमच्या पायांनी गढूळ झालेले पाणी पितात.
20. म्हणून, प्रभू परमेश्वर, त्यांना असे म्हणतो, पाहा! मी स्वत: पुष्ट मेंढी आणि बारीक ह्यांच्यात निवाडा करीन.
21. तुम्ही बाजूने खांद्याने ढकलता. आणि जी सर्व दुर्बळ झालेली त्यांना तुम्ही देशा बाहेर घालवून लावीपर्यंत त्यांना तुम्ही भोसकता,
22. म्हणून, मी माझ्या कळपाला वाचवीन. यापुढे त्यांची लूट होणार नाही. आणि मी मेंढ्या-मेंढ्यात न्यायनिवाडा करीन.
23. मग मी त्यांच्यावर एक मेंढपाळ नेमीन तो त्यांना चारील आणि माझा सेवक दावीद, ह्याला मी मेंढपाळ म्हणून नेमीन. तो त्यांस चारील; तो त्यांच्यावर मेंढपाळ होईल.
24. कारण मी परमेश्वर त्यांचा देव होईन. त्यांच्यामध्ये माझा सेवक दावीद त्यामध्ये अधिपती होईल मी परमेश्वर बोललो आहे.
25. मग मी त्यांच्याबरोबर एक शांततेचा करार करीन आणि दुष्ट वन्य पशू देशातून नाहीसे करीन, मग माझ्या मेंढ्या वाळवंटातही सुरक्षित राहतील आणि रानात झोपतील.
26. मग मी त्यास डोंगराभोवतालच्या स्थानांस आशीर्वाद असे करीन. कारण मी योग्य वेळी पाऊस पाडीन. ते आशीर्वादांचे वर्षाव होतील.
27. नंतर शेतातली झाडे त्यांचे फळ उत्पन्न करतील. आणि पृथ्वी आपला उपज देईल. माझी मेंढरे त्यांच्या देशात सुरक्षित राहतील; मी त्यांच्या जोखडाचे बंधने तोडून ज्यांनी त्यांना आपले दास केले त्यांच्या हातातून सोडवले म्हणजे ते जाणतील की मी परमेश्वर आहे.
28. यापुढे ते राष्ट्रांसाठी लूट असे होणार नाहीत आणि पृथ्वीवरील वनपशू त्यांना खाऊन टाकणार नाहीत. कारण ते सुखरुप राहतील. कोणीही त्यांना भयभीत करणार नाही.
29. कारण मी त्यांच्यासाठी नावाजण्याजोगी लागवड करीन, मग त्यांची पुन्हा देशात दुष्काळाने उपासमार होणार नाही. यापुढे राष्ट्रांकडून त्यांना अपमान सहन करावा लागणार नाही.
30. मग त्यांना समजून येईल की मीच त्यांचा परमेश्वर देव आहे, मी त्यांच्याबरोबर आहे, इस्राएलाचे घराणे माझे लोक आहेत, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
31. कारण तुम्ही माझी मेंढरे आहात, माझ्या कुरणातील मेंढरे आहात. आणि माझे लोक! मी तुमचा देव आहे! असे प्रभू परमेश्वर म्हणतो.” PE
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×