Bible Books

:

1. जो कोणी आपणास वेगळा करतो तो स्वतःची इच्छा पूर्ण करायला पाहतो;
आणि तो सर्व स्वस्थ सुज्ञतेविरूद्ध लढतो.
2. मूर्खाला समंजसपणात आनंद मिळत नाही,
पण केवळ आपल्या मनात काय आहे हे प्रगट करण्यात त्यास आनंद आहे.
3. जेव्हा वाईट मनुष्य येतो, त्याच्याबरोबर तिरस्कार येतो,
निर्भत्सना आणि लाज त्यासह येतात.
4. मनुष्याच्या मुखाचे शब्द खोल पाण्यासारखे आहेत;
ज्ञानाचा झरा वाहणाऱ्या प्रवाहासारखे आहेत.
5. जे कोणी चांगले करतात त्यांचा न्याय विपरित करण्यासाठी,
दुष्टाचा पक्ष धरणे चांगले नाही.
6. मूर्खाचे ओठ त्यास भांडणात पाडतात,
आणि त्याचे मुख मारास आमंत्रण देते.
7. मूर्खाचा नाश त्याच्या तोंडामुळे होतो,
आणि त्याचे ओठ त्यास स्वतःला पाश होतात.
8. गप्पागोष्टी करणाऱ्याचे शब्द स्वादिष्ट पक्वान्नासारखे आहेत,
आणि ते अगदी खोल पोटात शिरतात.
9. जो कोणी आपल्या कामात निष्काळजी आहे
तो नाश करणाऱ्याचा भाऊ आहे.
10. परमेश्वराचे नाव बळकट बुरुजाप्रमाणे आहे;
नीतिमान त्यामध्ये धावत जातो आणि सुरक्षित राहतो.
11. श्रीमंताची संपत्ती त्याचे बळकट नगर आहे;
आणि त्याच्या कल्पनेने तो उंच भींतीसारखा आहे.
12. मनुष्याच्या नाशापूर्वी त्याचे अंतःकरण गर्विष्ठ असते,
पण गौरवापूर्वी विनम्रता येते.
13. जो कोणी ऐकण्यापूर्वी उत्तर देतो,
त्याचे ते करणे मूर्खपणाचे आणि लज्जास्पद असते.
14. आजारपणात मनुष्याचा आत्मा जिवंत राहतो,
पण तुटलेला आत्मा कोणाच्याने सोसवेल?
15. सुज्ञाचे मन ज्ञान प्राप्त करून घेते,
आणि शहाणा ऐकून ते शोधून काढतो.
16. मनुष्याचे दान त्याच्यासाठी मार्ग उघडते,
आणि महत्वाच्या मनुष्यांसमोर त्यास आणते.
17. जो सुरुवातीला आपली बाजू मांडतो तो बरोबर आहे असे वाटते,
पण त्याचा प्रतिस्पर्धी येऊन त्यास प्रश्र विचारतो.
18. चिठ्ठ्या टाकल्याने भांडणे मिटतात,
आणि बलवान प्रतिस्पर्धी वेगळे होतात.
19. दुखवलेल्या भावाची समजूत घालणे हे बळकट तटबंदी असलेले शहर जिंकण्यापेक्षा कठीण आहे.
आणि भांडणे राजवाड्याच्या अडसरासारखे आहेत.
20. मनुष्याचे पोट त्याच्या मुखाच्या फळाने भरेल,
तो आपल्या ओठांच्या पीकाने तृप्त होईल.
21. जीवन किंवा मरण ही जीभेच्या अधिकारात आहेत;
आणि ज्या कोणाला ती प्रिय आहे तो तिचे फळ खातो.
22. ज्या कोणाला पत्नी मिळते त्यास चांगली वस्तू मिळते,
आणि त्यास परमेश्वराचा अनुग्रह प्राप्त होतो.
23. गरीब मनुष्य दयेची विनवणी करतो,
पण श्रीमंत मनुष्य कठोरपणाने उत्तर देतो.
24. जो कोणी पुष्कळ मित्र करतो तो आपल्याच नाशासाठी ते करतो,
परंतु एखादा असा मित्र असतो की तो आपल्या भावापेक्षाही आपणांस धरून राहतो. PE
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×