Bible Books

:

1. द्राक्षरस चेष्टा करणारा आहे आणि मादक पेय भांडखोर आहे;
पिण्याने झिंगणारा शहाणा नाही.
2. राजाचा राग सिंहगर्जनेसारखा असतो;
जो त्यास राग आणतो तो आपल्याच जीवाविरूद्ध पाप करतो.
3. जो कोणी भांडण टाळतो त्यास आदर आहे,
पण प्रत्येक मूर्ख वादविवादात उडी मारतो.
4. आळशी मनुष्य हिवाळा लागल्यामुळे नांगरीत नाही,
तो हंगामाच्या वेळी पिक शोधेल पण त्यास काहीही मिळणार नाही.
5. मनुष्याच्या मनातील योजना खोल पाण्यासारख्या असतात;
पण समजदार मनुष्य त्या बाहेर काढतो.
6. बरेच व्यक्ती विश्वासू असल्याची घोषणा करतात,
पण जो कोणी विश्वासू आहे त्या व्यक्तीस कोण शोधून काढेल?
पण खरोखरच असा व्यक्ती सापडणे कठीण असते.
7. जो कोणी मनुष्य चांगले करतो त्याच्या प्रामाणिकतेने चालतो,
आणि त्याच्या मागे त्याची मुले त्यास अनुसरतात आणि ते सुखी होतात.
8. जेव्हा राजा राजासनावर बसून न्यायनिवाड्याचे कार्य करतो,
तो आपल्या डोळ्यांनी सर्व वाईट गोष्टी उडवून टाकतो.
9. मी आपले हृदय शुद्ध केले आहे,
मी आपल्या पापापासून मोकळा झालो आहे असे कोण म्हणू शकेल?
10. भिन्नभिन्न अशी खोटी वजने आणि असमान मापे,
या दोन्हींचा परमेश्वरास तिरस्कार आहे.
11. तरुणसुध्दा आपल्या कृतीने
आपली वर्तणूक शुद्ध आणि सरळ आहे की नाही ते दाखवतो.
12. ऐकणारे कान आणि बघणारे डोळे,
हे दोन्ही परमेश्वरानेच केले आहेत.
13. झोपेची आवड धरू नकोस, धरशील तर दरिद्री होशील;
आपले डोळे उघड आणि तुला भरपूर खायला मिळेल.
14. विकत घेणारा म्हणतो, वाईट! वाईट!
परंतु जेव्हा तो तेथून निघून जातो तो फुशारकी मारतो.
15. तेथे सोने आहे आणि विपुल किंमती खडे आहेत,
पण ज्ञानमय वाणी मोलवान रत्न आहेत.
16. जो अनोळख्याला जामीन राहतो त्याचे वस्त्र ठेवून घे,
जेव्हा तो परक्यास जामीन झाला आहे म्हणून त्यास तारणादाखल ठेव.
17. कपटाची भाकर गोड लागते,
पण त्यानंतर त्याचे तोंड सर्व वाळूंनी भरेल.
18. सल्ल्याद्वारे योजना प्रस्थापित होतात,
म्हणून केवळ ज्ञानाच्या मार्गदर्शनाने लढाई चालू कर.
19. लावालावी करणारा गुप्त गोष्टी प्रगट करतो,
म्हणून बडबड करणाऱ्यांची संगत धरू नकोस.
20. जर एखादा मनुष्य आपल्या आईला किंवा वडिलांना शाप देईल,
तर त्याचा दीप अंधारात विझून जाईल.
21. सुरवातीला उतावळीने मिळवलेल्या संपत्तीचा
शेवट आशीर्वादित होणार नाही.
22. मी चुकीच्या बदल्यात परतफेड करीन असे म्हणू नकोस,
परमेश्वराची वाट पाहा आणि तो तुझे रक्षण करील.
23. असमान वजनाचा परमेश्वरास तिरस्कार आहे
आणि अप्रामाणिक तराजू चांगले नाही.
24. मनुष्याच्या पावलास परमेश्वर वाट दाखवतो.
तर कोणत्या मार्गाने जावे हे त्यास कसे कळेल?
25. हे पवित्र आहे असे उतावळीने म्हणणे असला नवस केल्यावर
मग विचार करीत बसणे हे मनुष्याने पाशात पडणे होय.
26. सुज्ञ राजा दुष्टांना पाखडून टाकतो,
आणि मळणी करण्याचे चक्र त्यांच्यावर फिरवतो.
27. मनुष्याचा आत्मा परमेश्वराचा दीप होय,
तो त्याच्या अंतर्यामाच्या सर्व भागांचा शोध घेतो.
28. कराराचा प्रामाणिपणा आणि विश्वसनियता राजाचे रक्षण करतात,
तो प्रेमाने राजासन बळकट करतो.
29. तरुण मनुष्याचे वैभव त्याचे बळ आहे.
आणि पिकलेले केस वृद्धाचे सौंदर्य आहे.
30. जखम करणारे घाय आणि वर्मी लागणारे फटके
दुष्टतेचे क्षालन करतात. PE
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×