Bible Versions
Bible Books

1 Samuel 16 (MRV) Marathi Old BSI Version

1 परमेश्वर शमुवेलला म्हणाला, “शौलसाठी तू किती दिवस शोक करत बसणार आहेस? राजा म्हणून मी त्याला झिडकारले तरी तू त्याच्याबद्दल वाईट वाटून घेत आहेस? आपल्या शिंगात तेल भरुन घे आणि बेथलहेमला जायला नीघ. तुला मी इशाय नावाच्या माणसाकडे पाठवतो. इशाय बेथलहेमला राहतो. त्याच्या एका मुलाची मी राजा म्हणून निवड केली आहे.”
2 2 तेव्हा शमुवेल म्हणाला, “मी कसा जाऊ? ही गोष्ट शौलने ऐकली तर तो माझा जीव घ्यायचा प्रयत्न करील.” परमेश्वर त्यावर त्याला म्हणाला, “तू बेथलहेमला जायला नीघ, बरोबर एक वासरु घे. “मी परमेश्वराला यज्ञ कायला चाललो आहे” असे म्हण.
3 3 इशायला यज्ञासाठी बोलाव. मग मी काय करायचे ते सांगिन. मी सांगेन त्या व्यक्तीला अभिषेक कर.”
4 4 शमुवेलने मग परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे केले. तो बेथलहेम येथे आला. तेव्हा तेथील वडीलधाऱ्यांना धास्ती वाटली. ते शमुवेलला भेटले. “आपली ही सलोख्याचीच भेट आहे ना”, असे त्यांनी शमुवेलला विचारले.
5 5 शमुवेल म्हणाला, “होय, मी स्नेहभावाने आलो आहे. मला परमेश्वरासाठी यज्ञ करायचा आहे. तयारीला लागा आणि माझ्याबरोबर यज्ञासाठी या.” शमुवेलने इशायला त्याच्या मुलांना तयार केले. त्यांनाही यज्ञात आमंत्रित करुन त्यात भाग घ्यायला सांगितले.
6 6 इशाय आणि त्याची मुले आली तेव्हा शमुवेलने अलियाबला पाहिले. शमुवेलला वाटले, “हाच तो परमेश्वराने निवडलेला माणूस!”
7 7 तेव्हा परमेश्वर शमुवेलला म्हणाला, “अलियाब उंचापुरा आणि देखणा आहे. पण रुपावर जाऊ नको. परमेश्वराची नजर माणसांसारखी नसते. तुम्ही बाह्यरुपाला भाळता पण परमेश्वर अंतरंग पाहतो. अलियाब ही योग्य व्यक्ती नव्हे.”
8 8 मग इशायने आपला दुसरा मुलगा अबीनादाब याला बोलावले. तो शमुवेल समोरुन गेला. शमुवेल म्हणाला, “हीही परमेश्वराची निवड नव्हे.”
9 9 मग इशायने शम्माला शमुवेलच्या समोर यायला सांगितले. तेव्हाही शमुवेल म्हणाला, “हाही तो नव्हे.”
10 10 इशायने आपल्या सातही मुलांना शमुवेल पुढे हजर केले. पण शमुवेल म्हणाला, “यापैकी कोणालाही परमेश्वराने निवडलेले नाही.”
11 11 त्याने पुढे इशायला विचारले, “इथे तुझी सगळी मुलं हजर आहेत ना?” इशाय म्हणाला, “नाही आणखी एक आहे सगळ्यात धाकटा तो रानात मेंढरे राखायला गेला आहे.”शमुवेल म्हणाला, “त्याला बोलावणे पाठवून इथे आण. तो येईपर्यंत आपण जेवायला सुरुवात करयाची नाही.
12 12 इशायने मग कोणालातरी पाठवून आपल्या धाकट्या मुलाला यायला सांगितले. तो अतिशय देखणा, तांबूस वर्णाचा तरुण होता. परमेश्वर आता शमुवेलला म्हणाला, “ऊठ आणि याला अभिषेक कर. हाच तो.”
13 13 शमुवेलने आपले तेलाने भरलेले शिंग उचलले आणि इशायच्या या धाकट्या मुलावर सर्व भावंडांसमोर त्या खास तेलाने अभिषेक केला. तेथून पुढे दावीदवर परमेश्वराच्या आत्म्याचा जोरदार संचार होऊ लागला. एवढे झाल्यावर शमुवेल रामा येथे परतला.
14 14 इकडे परमेश्वराच्या आत्म्याने शौलची साथ सोडली. परमेश्वराने पाठवलेला एक दुरात्मा त्याला त्रस्त करु लागला.
15 15 शौलचे नोकर त्याला म्हणाले “हा परमेश्वराकडचा दुरात्मा तुम्हाला त्रास देत आहे.
16 16 आम्हाला आज्ञा द्या आम्ही कोणी चांगला वीणा वाजवणारा शोधतो. तुम्ही त्या दुरात्म्याने त्रस्त व्हाल तेव्हा हा वादक वीणा वाजवेल. म्हणजे तो दुष्ट आत्मा तुम्हाला सोडून जाईल आणि तुम्हाला बरे वाटेल.”
17 17 तेव्हा शौल आपल्या सेवकांना म्हणाला, “शोधा तर असा कुणीतरी आणि त्याला माझ्याकडे आणा.”
18 18 यावर एक चाकर म्हणाला, “इशाय नावाचा एक माणूस बेथलहेम येथे राहतो. त्याचा मुलगा मला माहीत आहे. त्याला वीणा वाजवता येते. तो चांगला लढवय्या सुध्दा आहे. तो तरनरीत, देखणा असून परमेश्वराची त्याला साथ आहे.”
19 19 तेव्हा शौलने इशायकडे संदेश पाठवला. निरोप्यांनी इशायला सांगितले, “तुला दावीद म्हणून मुलगा आहे. तुझी मेंढरे तो राखतो. त्याला माझ्याकडे पाठव.”
20 20 तेव्हा इशायने शौलसाठी काही भेटवस्तू घेतल्या. एक गाढव. थोडी भाकरी, द्राक्षारसाचा एक बुधला आणि एक करडू या वस्तू दावीदजवळ देऊन त्याला शौलकडे पाठवले.
21 21 दावीद शौलकडे गेला आणि त्याच्या समोर उभा राहिला. शौलला तो फारच आवडला. दावीद त्याचा शस्त्रवाहक बनला.
22 22 शौलने इशायला निरोप पाठवला, “दावीदला माझा सेवक म्हणून इथेच राहू दे. त्याच्यावर माझा फार लोभ आहे.”
23 23 मग जेव्हा जेव्हा शौल दुरात्म्या मुळे हैराण होई तेव्हा तेव्हा दावीद वीणावादन करी. त्यामुळे दुरात्मा पळून जाऊन शौलला दिलासा मिळे.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×