Bible Versions
Bible Books

Zechariah 8 (MRV) Marathi Old BSI Version

1 सर्व शक्तिमान परमेश्वराचा हा संदेश आहे.
2 2 सर्व शक्तिमान परमेश्वर म्हणतो, “माझे सियोनवर खरोखरीच प्रेम आहे. माझे तिच्यावर इतके प्रेम आहे की तिची माझ्यावरील श्रध्दा उडताच माझा संताप झाला.”
3 3 परमेश्वर म्हणतो, “मी सियोनला परत आलो आहे. मी यरुशलेमला रहात आहे. यरुशलेम “निष्ठावान नगरी म्हणून ओळखली जाईल. सर्व शक्तिमान परमेश्वराचा पर्वत, “पवित्र पर्वत” म्हणून ओळखला जाईल.”
4 4 सर्व शक्तिमान परमेश्वर म्हणतो, “वृध्द स्त्री - पुरुष यरुशलेमच्या सार्वजानिक ठिकाणी पुन्हा दिसू लागतील. लोक इतके दीर्घायुषी होतील की चालताना त्यांना काठीच्या आधाराची गरज भासेल.
5 5 रस्त्यावर खेळणाऱ्या मुलांनी ती नगरी राजबजून जाईल.
6 6 देव म्हणतो, वाचलेल्यांनाह्याचे आश्चर्य वाटेल. आणि मलाही विस्मय वाटेल.”
7 7 सर्व शक्तिमान परमेश्वर म्हणतो, “पाहा! पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील देशांतून मी माझ्या माणसांची मुक्तता करीत आहे.
8 8 मी त्यांना परत येथे आणि ते यरुशलेममध्ये राहतील. ते माझे लोक होतील आणि मी त्यांचा कृपावंत वश्रध्दावान देव होईल.”
9 9 सर्व शक्तिमान परमेश्वर म्हणतो, “सामर्थ्यवान व्हा! सर्व शक्तिमान परमेश्वराने मंदिराच्या पुननिर्मितीच्या वेळी पाया घालताना, संदेष्ट्यांमार्फत जो संदेश दिला, तोच तुम्ही आज ऐकत आहात.
10 10 त्या वेळेपूर्वी, पगारी कामगार ठेवायला वा भाड्याने जनावरे घ्यायला लोकांजवळ पैसा नव्हता. दळणवळण सुरक्षित नव्हते. सर्वच अडचणीतून सुटका झाली नव्हती. मी प्रत्येकाला दुसऱ्याविरुध्द भडकविले होते.
11 11 पण आता तसे नाही. वाचलेल्यांची स्थिती तशी असणार नाही.” सर्व शक्तिमान परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.
12 12 “ते लोक शांततेत लागवड करतील. त्यांच्या द्राक्षवेलींना द्राक्षे लागतील. जमीन चांगली पिके देईल आणि आकाश पाऊस देईल. मी ह्या सर्व गोष्टी माझ्या ह्या लोकांना देईल.
13 13 शिव्या शाप देण्यासाठी लोकांनी इस्राएल यहूदाच्या नावाचा वापर करण्यास सुरवात केली होती. पण मी इस्राएलची यहूदाची पापातून मुक्तता करीन त्यांची नावे म्हणजे आशीर्वचन बनतील तेव्हा घाबरु नका! सामर्थ्यवान. व्हा!”
14 14 सर्व शक्तिमान परमेश्वर म्हणतो, “तुमच्या पूर्वजांनी मला संतापविले. म्हणून मी त्यांचा नाश करण्याचा निर्धार केला. माझा निश्चय बदलायचा नाही असे मी ठरविले.” सर्व शक्तिमान परमेश्वर असे म्हणाला.
15 15 “पण आता मात्र माझे मन:परिवर्तन झाले आहे. आणि म्हणून मी यरुशलेमवर यहूदाच्या लोकांशी चांगले वागायचे ठरविले आहे. तेव्हा घाबरु नका!
16 16 पण तुम्हाला पुढील गोष्टी करणे भाग आहे! तुमच्या शेजाऱ्यांना सत्य सांगा. न्यायालयात निर्णय घेतेवेळी जे सत्य आणि योग्य अशाच गोष्टी करा. त्यामुळे शांतता येईल.
17 17 आपल्या शेजाऱ्यांना त्रास देण्यासाठी कट करु नका. खोटी आश्वासने देऊ नका. अशा वाईट गोष्टीत आनंद मानू नका. का? कारण या गोष्टींची मला चीड आहे.” परमेश्वराने या गोष्टी सांगितल्या आहेत.
18 18 सर्व शक्तिमान परमेश्वराकडून मला पुढील संदेश मिळाला:
19 19 सर्व शक्तिमान परमेश्वर म्हणतो, “तुम्ही चौथ्या, पाचव्या, सातव्या आणि दहाव्या महिन्याच्या विशिष्ट दिवशी शोक प्रकट करता उपवास करता. आता त्या शोकदिनांचे सणावारात परिवर्तन करा. ते छान, आनंदाचे सुटीचे दिवस होतील तुम्ही सत्य आणि शांती ह्यावर प्रेम केलेच पाहिजे.”
20 20 सर्व शक्तिमान परमेश्वर म्हणतो, “भविष्यात, पुष्कळ गावचे लोक यरुशलेमला येतील.
21 21 निरनिराळ्या गावातील लोक एकमेकांना भेटतील. ते म्हणतील, ‘आम्ही सर्व शक्तिमान परमेश्वराची उपासना करण्यास जात आहोत.’ आणि इतरलोक म्हणतील, ‘आम्हालासुध्दा यावेसे वाटते.”‘
22 22 पुष्कळ लोक आणि बलिष्ठ राष्ट्रे, सर्व शक्तिमान परमेश्वराच्या शोधात आणि त्याची उपासना करण्यासाठी यरुशलेमला येतील.
23 23 सर्व शक्तिमान परमेश्वर म्हणतो, “त्या वेळी, वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक यहूदाकडे येऊन त्याचा कोट पकडून त्याला विचारतील, ‘देव तुमच्याबरोबर आहे असे आम्ही ऐकलंय! त्याची उपासना करण्यासाठी आम्ही तुझ्याबरोबर येऊ का?”
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×