Bible Versions
Bible Books

Jeremiah 18 (MRV) Marathi Old BSI Version

1 हा संदेश यिर्मयाला परमेश्वराकडून आलेला आहे:
2 2 “यिर्मया, कुंभाराच्या घरी जा. मी तेथे तुला माझा संदेश देईन.”
3 3 म्हणून मी कुंभाराच्या घरी गेलो, मी त्याला चाकावर चिखल ठेवून काम करताना पाहिले.
4 4 तो चिखलापासून भांडे बनवीत होता. पण त्यात काहीतरी चुकले म्हणून कुंभाराने त्याच चिखलाचा उपयोग करुन दुसरे भांडे बनविले. आपल्या हाताने त्याला पाहिजे तसा आकार दिला.
5 5 मग मला परमेश्वराचा संदेश मिळाला:
6 6 “इस्राएलच्या कुंटुंबीयांनो, मी (देव) अगदी असेच तुमच्या बाबतीत करु शकतो. तुम्ही जणू काही कुंभाराच्या हातातील चिखल आहात आणि मी कुंभार आहे.
7 7 मी राष्ट्र राज्य ह्याबद्दल बोलण्याची वेळ येण्याचा संभव आहे. मी कदाचित् त्या राष्ट्राला वर ओढीन असे म्हणेन वा त्या राष्ट्रांला खाली खेचून त्या राष्ट्राचा वा राज्याचा नाश करीन असेही म्हणेन.
8 8 पण त्या राष्ट्रातील लोकांचे हृदयपरिवर्तन झाल्यास ते जगतील. त्या राष्ट्रातील लोक दुष्कृत्ये करण्याचे कदाचित थांबवतील. मग माझे मतपरिवर्तन होईल. त्या राष्ट्राचा नाश करण्याचा बेत मी अंमलात आणणार नाही.
9 9 मी राष्ट्राबद्दल बोलण्याची आणखी एकदा वेळ, कदाचित् येईल. मी ते राष्ट्र उभारीन आणि वसवेन असे मी म्हणेन.
10 10 पण ते राष्ट्र पापे करीत आहे आणि माझी आज्ञा पाळत नाही, असेही मला दिसण्याचा संभव आहे. मग मात्र त्या राष्ट्राच्या भल्यासाठी योजलेल्या योजनांचा मला फेरविचार करावा लागले.
11 11 “म्हणून, यिर्मया, यरुशलेम आणि यहूदा येथे राहणाऱ्या लोकांना सांग की परमेश्वर असे म्हणतो: ‘आताच्या आता तुमच्यावर संकटे आणण्याची मी तयारी करीत आहे. मी तुमच्याविरुद्ध बेत आखत आहे. तेव्हा तुम्ही पापे करण्याचे थांबवा. प्रत्येकाने बदलावे सत्कृत्ये करावीत.”
12 12 पण यहूदातील लोक म्हणतील, ‘असा प्रयत्न करुन काही भले होणार नाही. आम्हाला पाहिजे तेच आम्ही करीत राहू आमच्यातील प्रत्येकाच्या हट्ठी आणि दुष्ट मनाला वाटेल तेच आम्ही करु.”
13 13 परमेश्वर सांगत असलेल्या गोष्टी ऐका: “दुसऱ्या राष्ट्रांना हा प्रश्न विचारा. ‘इस्राएलने केलेल्या पापाप्रमाणे, पापे आणखी कोणी केल्याचे तुम्ही ऐकले आहे का?’ आणि इस्राएल तर देवाच्या दृष्टीने विशेष आहे. ती देवाच्या वधूप्रमाणे आहे.
14 14 तुम्हाला हेही माहीत आहे की लबानोनमधील पर्वतांवरचे बर्फ कधीच वितळत नाही थंड सतत वाहणारे झरे कधीच सुकत नाहीत.
15 15 पण माझे लोक मला विसरले आहेत. ते कवडी मोलाच्या मूर्तींना वस्तू अर्पण करतात. ते जे काय करतात, त्यालाच अडखळतात त्यांच्या पूर्वजांच्या जुन्या रस्त्यांपाशी ते अडखळतात माझी माणसे, माझ्यामागून चांगल्या मार्गाने येण्याऐवजी, आडवळणाने वाईट मार्गाने जाणे पसंत करतील.
16 16 म्हणून यहूदाचा देश म्हणजे एक निर्जन वाळवंट होईल. ह्या देशाच्या जवळून जाताना, प्रत्येकवेळी लोक धक्क्याने मान हलवून नि:श्वास सोडतील. ह्या देशाचा, अशा रीतीने, नाश झालेला पाहून त्यांना धक्का बसेल.
17 17 मी यहूदाच्या लोकांची फाटाफूट करीन. ते त्यांच्या शत्रूंपासून पळ काढतील. पूर्वेकडचा वारा ज्याप्रमाणे सर्व वस्तू दूर उडवून देतो, त्याप्रमाणे मी यहूदातील लोकांना दूर पसरवून देईन. मी त्या लोकांचा नाश करीन. मी त्यांच्या मदतीला येत आहे, असे त्यांना दिसण्याऐवजी, मी त्यांना सोडून जाताना दिसेन.”
18 18 नंतर यिर्मयाचे शत्रू म्हणाले, “या आपण यिर्मयाविरुध्द कट करु या. नियमांची शिकवण याजकंाकडून नक्कीच विसरली जाणार नाही. सुज्ञांचा सल्ला अजूनही आमच्याजवळ असेल. आमच्यापाशी संदेष्ट्याचे शब्द असतील. म्हणून त्याच्याबद्दल खोटे सांगू या. त्यामुळे त्याचा नाश होईल. तो सांगत असलेल्या कोणत्याही गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचे नाही.”
19 19 परमेश्वरा, माझे ऐक! माझे म्हणणे ऐकून घे आणि कोण बरोबर आहे ते ठरव.
20 20 चांगल्याची परतफेड लोकांनी दुष्टाव्याने करावी का? नाही! देवा, मी केलेल्या गोष्टी तुला आठवतात का? मी तुझ्यासमोर उभा राहिलो आणि ह्या लोकांना तू शिक्षा करु नये म्हणून त्यांच्याविषयी चांगल्या गोष्टी मी तुला सांगितल्या. पण ते मला सापळ्यात पकडून ठार मारायला बघत आहेत.
21 21 म्हणून दुष्काळात त्यांच्या मुलांची उपासमार होऊ देत. त्यांचे शत्रू तलवारीने त्यांचा पराभव करु देत. त्यांच्या बायका वांझ होऊ देत. यहूदातील पुरुषांना मृत्यू येऊ देत. त्यांच्या बायकांना विधवा कर युद्धात तेथील तरुण मारले जाऊ देत.
22 22 त्यांच्या घरांत शोककळा पसरु देत. शत्रूला, अचानक, त्यांच्यावर आक्रमण करायला लावून त्यांना रडव. माझ्या शत्रूंनी मला सापळ्यात पकडण्याचा प्रयत्न केला, म्हणून हे सर्व घडू देत. मी सापळ्यात अडकावे म्हणून त्यांनी आपला सापळा लपवून ठेवला आहे.
23 23 परमेश्वरा, मला मारण्यासाठी त्यांनी रचलेले बेत तुला माहीत आहेतच. त्यांना त्यांच्या अपराधांबद्दल क्षमा करु नकोस. त्यांची पापे पुसून टाकू नकोस. माझ्या शत्रूंचा नाश कर. तू रागावला असतानाच त्या लोकांना शिक्षा कर.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×