Bible Versions
Bible Books

2 Kings 18 (MRV) Marathi Old BSI Version

1 अहाजचा मुलगा हिज्कीया हा यहूदाचा राजा झाला. एलाचा मुलगा होशे याच्या इस्राएलवरील सत्तेचे तेव्हा तिसरे वर्ष होते.
2 2 हिज्कीया पंचवीस वर्षाचा असताना राज्यावर आला आणि त्याने यरुशलेममध्ये एकोणतीस वर्षे राज्य केले. याच्या आईचे नाव अबी.ही जखऱ्याची मुलगी.
3 3 आपला पूर्वज दावीद याच्याप्रमाणेच हिज्कीयाचे वर्तनही परमेश्वराच्या दृष्टीने उचित असेच होते.
4 4 हिज्कीयाने उंचस्थानावरील पुजास्थळे नष्ट करुन टाकली. तसेच स्मृतिस्तंभ, आणि अशेराचे खांबही पाडून टाकले. इस्राएलचे लोक तेव्हा मोशेने केलेल्या पितळी सापापुढे धूप जाळत असत. या पितळी सापाला “नहुश्तान”म्हणत. लोक याची पूजा करत म्हणून हिज्कीयाने त्याचे तुकडे तुकडे केले.
5 5 इस्राएलचा देव परमेश्वर याच्यावरच हिज्कीयाचा विश्वास होता. हिज्कीयासारखा राजा यहूदात त्याच्या आधी किंवा नंतरही झाला नाही. यहूदात हिज्कीया याच्या कारकिर्दीचा प्रारंभ
6 6 त्याची परमेश्वरावर निष्ठा होती. त्यात त्याने खंड पडू दिला नाही. मोशेला परमेश्वराने दिलेल्या आज्ञांचे हिज्कीयाने पालन केले.
7 7 परमेश्वर हिज्कीयाच्या बाजूचा होता. त्यामुळे त्याने जे जे केले त्यात त्याला यश आले.अश्शूरच्या राजाविरुध्द बंड करुन हज्किीयाने त्याचे मांडलिकत्व नाकारले.
8 8 थेट गज्जा आणि त्याच्या भोवतालच्या प्रदेशापर्यंत त्याने पलिष्ट्यांचा पराभव केला. लहान खेड्यापासून मोठ्या नगरापर्यंत सर्व पलिष्टी गावे त्याने जिंकली.
9 9 अश्शूरचा राजा शल्मनेसर याने शोमरोनवर हल्ला केला. त्याच्या सैन्याने नगराला वेढा दिला. हिज्कीयाच्या यहूदावरील सत्तेच्या चौथ्या वर्षी (म्हणजेच एलाचा मुलगा होशे याचे इस्राएलवरच्या अधिपत्याचे सातवे वर्ष असताना) हे झाले.
10 10 तीन वर्षांनी शल्मनेसरने शोमरोन घेतले. यहूदाचा राजा हिज्कीया याच्या सहाव्या वर्षी हे झाले. (आणि अर्थातच इस्राएलचा राजा होशे याच्या नवव्या वर्षी) अश्शूरांचा शोमरोनला वेढा
11 11 अश्शूरच्या राजाने इस्राएल लोकांना कैद करुन अश्शूरला नेले. त्यांना त्याने हलहा येथे, गोजनमधील हाबोर नदीजवळ आणि मेदी नगरांमध्ये ठेवले.
12 12 इस्राएल लोकांनी त्यांच्या परमेश्वर देवाची आज्ञा पाळली नाही, परमेश्वराच्या कराराचा भंग केला. परमेश्वराचा सेवक मोशे याचे करार पाळले नाहीत म्हणून हे सर्व झाले. लोकांनी परमेश्वराचा करार जुमानला नाही, त्याची शिकवण ऐकली नाही.
13 13 हिज्कीयाच्या चौदाव्या वर्षी अश्शूरचा राजा सन्हेरीब याने यहूदातील सर्व मजबूत नगरांवर हल्ला चढवला. सर्व नगरांचा त्याने पाडाव केला.
14 14 तेव्हा यहूदाचा राजा हिज्कीया याने अश्शूरच्या राजाला लाखीश येथे निरोप पाठवला. निरोपात हिज्कीयाने म्हटले, “माझ्या हातून चूक झाली आहे. तुम्हाला हवे ते द्यायला मी तयार आहे. पण माझ्यावर हल्ला करु नये.”यावर अश्शूरच्या राजाने यहूदाचा राजा हिज्कीया याला अकरा टन चांदी आणि एक टन सोने अशी खंडणी मागितली.
15 15 हिज्कीयाने परमेश्वराच्या मंदिरातील आणि राजवाड्याच्या खजिन्यातील सर्व चांदी बाहेर काढली.
16 16 परमेश्वराच्या मंदिराचे दरवाजे आणि खांब सोन्याच्या पल्याने मढवले होते ते सर्व काढून हिज्कीयाने घेतले आणि हे सोने अश्शूरच्या राजाला दिले.
17 17 अश्शूरच्या राजाने मोठ्या सैन्यासोबत आपले तीन महत्वाचे सेनापती यरुशलेममध्ये राजा हिज्कीयाकडे पाठवले. तेव्हा ते लाखीश येथून यरुशलेमला निघाले. वरच्या तलावाच्या पाटापाशी ते उभे राहिले. (परिटाच्या शेताकडे जो रस्ता जातो त्या वाटेवर हा वरचा तलाव आहे)
18 18 तेथून त्यांनी राजाला निरोप पाठवला. राजाचा खानगीकडील कारभारी एल्याकिम (हा हिल्कीयाचा मुलगा) चिटणीस शेबना आणि नोंदणी लेखक आसाफचा मुलगा यवाह हे त्यांना भेटायला तेव्हा पुढे आले.
19 19 तेव्हा एक सेनापती त्यांना म्हणाला, “अश्शूरचा महान राजा काय म्हणतो ते हिज्कीयाला सांगा:तू कशाचा भरवंसा धरतो आहेस?
20 20 तुझ्या तोंडचे शब्द पोकळ, अर्थहीन आहेत. तू म्हणालास, “लढाईसाठी पुरेशी मसलत आणि सामर्थ्य माझ्याजवळ आहे.” पण माझ्यापासून फुटून निघाल्यापासून तुला कोणाचा आधार आहे?
21 21 काठी म्हणून तू ज्याच्यावर रेलला आहेस तो तर मोडका बांबू आहे. ही काठी म्हणजे मिसर. माणूस अशा काठीवर विसंबून राहिला तर ती मोडून पडेल हातात रुतेल आणि क्लेश देईल लोक विश्वास ठेवतात तो मिसरचा राजा हा असा आहे.
22 22 तू कदाचित् असे म्हणशील, “आम्ही परमेश्वर देवावर भरवसा ठेवतो.” पण हिज्कीयाने परमेश्वराची उंचावरील पूजास्थळे आणि वेदी काढून टाकल्या आणि “फक्त यरुशलेममधील वेदीपुढेच आराधना करावी” असे यहूदा आणि यरुशलेम येथील लोकांना सांगितले हे मला माहीत आहे.
23 23 आता माझा स्वामी अश्शूराचा राजा याच्याशी हा करार कर. तुझ्याकडे घोड्यांवर स्वार व्हायला माणसे असतील तर मी तुला दोन हजार घोडे द्यायचे कबूल करतो.
24 24 माझ्या स्वामीच्या सर्वात कनिष्ठ सेवकाचा देखील तू पराभव करु शकणार नाहीस. रथ आणि घोडेस्वार यांच्यासाठी तू मिसरवर अवलंबून आहेस.
25 25 मी यरुशलेमचा संहार करायला चाल करुन आलोय तो काही परमेश्वराचा पाठिंबा असल्याशिवाय नव्हे. परमेश्वरा मला म्हणाला, “या देशावर स्वारी करुन त्याचा पूर्ण पाडाव कर.”
26 26 तेव्हा हिल्कीयाचा मुलगा एल्याकीम, शेबना आणि यवाह हे सेनापतीला म्हणाले, “आमच्याशी तू कृपया अरामी भाषेत बोल. आम्हाला ती भाषा कळते. यहूदी भाषेत बोलू नको. कारण नाही तर तटबंदीवरील लोक आपले बोलणे ऐकतील.”
27 27 पण रब-शाके त्यांना म्हणाला, “परमेश्वराने काही मला फक्त तुझ्याशी आणि तुझ्या राजाशी बोलायला पाठवलेले नाही तटबंदीवरील लोकांशीही मी बोलतो आहे. तुमच्याबरोबरच त्यांनाही स्वत:चे मलमूत्र चाटायची वेळ येणार आहे.”
28 28 मग रबशाके यहूदी भाषेत मोठ्याने ओरडून म्हणाला, “अश्शूरचा थोर राजा काय म्हणतो ते ऐका
29 29 राजाचे म्हणणे आहे, ‘हिज्कीयाच्या भूलथापांना बळी पडू नका. माझ्यापासून तो तुम्हाला वाचवू शकणार नाही.’
30 30 तो म्हणतो तसे परमेश्वरावर विसंबून राहू नका. हिज्कीया तुम्हाला सांगतो, ‘परमेश्वर आपल्याला वाचवील. अश्शूरचा राजा आपल्या शहराजा पराभव करु शकणार नाही.’
31 31 पण हिज्कीयाचे ऐकू नका.“कारण अश्शूरचा राजा म्हणतो ‘माझ्याशी तह करा आणि माझ्याकडे या. तसे केलेत तर आपापल्या द्राक्षवेलीवरची, अंजिराच्या झाडावरची फळे तुम्हाला खायला मिळतील. स्वत:च्या विहिरीचे पाणी प्यायला मिळेल.
32 32 तुमच्या भूमीसारख्याच दुसऱ्या भूमीत मी तुम्हाला घेऊन जाईपर्यंत तुम्ही असे वागा. तरच तुम्ही जगाल; मरणार नाही. आणि हिज्कीयाचे ऐकू नका. तो तुमचे ह्दयपरिवर्तन करु पाहात आहे. ‘परमेश्वर आपल्याला वाचवेल’ असे तो म्हणतो.
33 33 इतर दैवतांनी आपले देश अश्शूरच्या राजाच्या तावडीतून सोडवले आहेत असे अजून झाले आहे काय? कधीच नाही.
34 34 कुठे आहेत हमाथ आणि अर्पद यांची दैवतं? सफरवाईम, हेना, इळ्व यांची दैवते कुठे गेले? त्यांनी शोमरोनचे माझ्यापासून रक्षण केले का? नाही.
35 35 इतर राष्ट्रांच्या दैवतांनी आपापली भूमी माझ्यापासून सुरक्षित ठेवली का? नाही माझ्याहातून परमेश्वर यरुशलेम वाचवणार का? नाही.”
36 36 पण लोक गप्पच होते. ते सेनापातीला काहीही बोलले नाहीत. कारण “त्यांनी काहीही उत्तर द्याचये नाही” अशी राजा हिज्कीयाची त्यांना आज्ञा होती.
37 37 हिल्कीयाचा मुलगा एल्याकीम (एल्याकीम राजवाड्याचा कारभारी होता) चिटणीस शेबना आणि असाफचा मुलगा यवाह (हा नोंदी करणारा होता.) हिज्कीयाकडे आले. शोकाकुल होऊन त्यांनी वस्त्रे फाडली होती. अश्शूरचा सेनापती काय म्हणाला ते त्यांनी हिज्कीयाला सांगितले.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×