Bible Versions
Bible Books

Isaiah 53 (MRV) Marathi Old BSI Version

1 “आम्ही जाहीर केलेल्या गोष्टींवर खरा विश्वास कोणी ठेवला? परमेश्वराने केलेली शिक्षा खरोखरी कोणी स्वीकारली?
2 2 तो एखाद्या रोपट्याप्रमाणे परमेश्वरासमोर वाढला. ओसाड जमिनीवर वाढणाऱ्या अंकुराप्रमाणे तो होता. त्याच्यात काही विशेष नव्हते. त्याला विशेष शोभा नव्हती. आपण त्याच्याकडे पाहिल्यावर तो आपल्याला आवडावा असे त्याच्यात काहीही वैशिष्ट्य नव्हते.
3 3 लोकांनी त्याची चेष्टा केली. आणि त्याचे मित्र त्याला सोडून गेले. तो खूप दु:खी व्यथित माणूस होता. घृणा दु:ख म्हणजे काय हे त्याला चांगले समजले होते. लोक त्याच्याकडे साधे पाहण्याचेही कष्ट घेत नव्हते. तो आमच्या लक्षातही आला नाही.
4 4 पण त्याने आमचा त्रास स्वत:चा मानला. त्याने आमचे दु:ख आणि वेदना स्वत: भोगल्या आम्हाला वाटले की देव त्यालाच शिक्षा करीत आहे, त्याने केलेल्या कर्मांबद्दल त्याला ताडन करीत आहे.
5 5 पण आमच्या दुष्कृत्यांबद्दल त्याला दु:ख भोगावे लागले. आमच्या अपराधांमुळे तो भरडला गेला. आमचे कर्ज, आमची शिक्षा, त्याच्यावर लादली गेली. त्याने दु:ख सहन केले. म्हणून आम्ही बरे झालो.
6 6 पण त्याने एवढे सगळे केल्यानंतरही आपण मेंढ्यांप्रमाणे भरकटत गेलो. आम्ही प्रत्येकजण स्वत:च्या मार्गाने गेलो परमेश्वराने आपल्याला अपराधातून मुक्त केल्यावर आणि आपले अपराध त्याच्या नावावर केल्यावर आपण असे वागलो.
7 7 त्याला इजाही झाली आणि शिक्षाही झाली. पण त्याने कधीही तक्रार केली नाही. ठार मारायला नेणाऱ्या मेंढीप्रमाणे तो अगदी गप्प राहिला. मेंढ्यांची लोकर कापताना तो जसा शांत असतो तसा तो शांत होता. स्वत:चा बचाव करण्यासाठी त्याने कधीही तोंड उघडले नाही.
8 8 लोकांनी बळजबरीने त्याला नेले आणि त्याला योग्य न्याय दिला नाही. त्याला मृत्युलोकातून उचलून आणल्यामुळे त्याच्या वारसांविषयी कोणी काहीही सांगू शकत नाही. माझ्या लोकांच्या पापाची किंमत मोजण्यासाठी त्याला शिक्षा केली गेली.
9 9 तो मेल्यावर त्याला श्रीमंताबरोबर पुरले. त्याने काहीही चूक केली नव्हती. तो कधीही खोटे बोलला नाही पण तरीही त्याच्या बाबतीत हे घडून आले.
10 10 परमेश्वराने त्याला चिरडून टाकण्याचे ठरविले आणि परमेश्वराने दु:ख भोगलेच पाहिजे असे निश्चित केले. म्हणून सेवक स्वत:चा बळी देण्यास तयार झाला. पण त्याला नवे जीवन मिळेल आणि तो खूप खूप जगेल. तो त्याच्या लोकांना पाहील. परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे, सेवकाने करायच्या, सर्व गोष्टी तो पूर्ण करील.
11 11 त्याच्या आत्म्याला खूप क्लेश होतील. पण चांगल्या गोष्टी घडताना तो पाहील. तो जे शिकेल त्याबद्दल तो समाधान पावेल. माझा सज्जन सेवक, अनेक लोकांना त्यांच्या अपराधांतून, मुक्त करील. आणि त्यांच्या पापांचे ओझे स्वत:च्या खांद्यावर घेईल.
12 12 ह्यामुळेच मी त्याला सर्व लोकांत श्रेष्ठ बनवीन. बलवान माणसांबरोबर त्याला प्रत्येक गोष्टीत वाटा मिळेल. मी त्याच्यासाठी हे सर्व करीन कारण तो लोकांसाठी जगला आणि मेला. लोकांनी त्याला गुन्हेगार म्हटले. पण त्याने पुष्कळ लोकांच्या पापांचे ओझे स्वत: वाहिले. आणि तो पापी लोकांकरीता बोलतो आहे.”
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×