Bible Versions
Bible Books

2 Chronicles 31 (MRV) Marathi Old BSI Version

1 अशा तऱ्हेने वल्हांडणाच्या उत्सवाची समाप्ती झाली. यरुशलेममध्ये त्यासाठी जमलेले इस्राएल लोक यहूदात आपापल्या गावी परतले. तिथे गेल्यावर त्यांनी दैवतांच्या दगडी मूर्ती फोडून टाकल्या. या खोट्या नाट्या दैवतांची पूजा होत असे. अशेराचे खांबही त्यांनी उखडून टाकले. यहूदा आणि बन्यामिन प्रांतातील सर्वच्यासर्व उंच स्थाने आणि वेद्या त्यांनी उद्ध्वस्त केल्या. एफ्राइम आणि मनश्शे या प्रदेशातील लोकांनीही तेच केले. गैर देवतांच्या प्रार्थनेसाठी बनवण्यात आलेल्या सगळ्या गोष्टींचा त्यांनी नाश केला. तेव्हाच सर्व इस्राएल लोक घरोघरी गेले.
2 2 लेव्यांची आणि याजकांची गटागटां मध्ये विभागणी केलेली होती. त्यापैकी प्रत्येक गटाला आपापले विशेष कामकाज नेमून दिलेले होते. राजा हिज्कीयाने त्या सर्वाना आपला कारभार हाती घ्यायला सांगितले. होमार्पणे शांतिअर्पणे वाहणे हे लेवींचे याजकांचे नेमलेले काम होते. तसेच मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे म्हणणे परमेश्वराच्या मंदिरात सेवा करणे हे ही त्यांचे काम होते.
3 3 यज्ञात अर्पण करण्यासाठी म्हणून हिज्कीयाने आपल्या पशुधनातील काही पशू दिले. सकाळ संध्याकाळच्या दैनिक होमार्पणांखातर त्यांचा विनियोग करण्यात आला. शब्बाथ, नवचंद्रदर्शनी इतर नैमित्तिक कार्ये या दिवशीही होमार्पणे होत असत. हे परमेश्वराच्या नियमशास्त्रानुसार होत असे.
4 4 आपल्या उत्पन्नातील ठराविक हिस्सा लोकांना लेवी याजक यांना द्याव लागत असे. तो त्यांनी द्यावा अशी आज्ञा राजा हिज्कीयाने केली. त्यामुळे नियतकार्य निर्वेधपणे प्रभूच्या नियमशास्त्रानुसार करणे याजकांना लेवींना शक्य झाले.
5 5 ही आज्ञा सर्व प्रजेच्या कानी गेली. त्याबरोबर इस्राएल लोकांनी आपले धान्याचे पीक, द्राक्ष, तेल, मध आणि इतर बागायती उत्पन्न या सगळ्याचा एकदशांश भाग आणून दिला.
6 6 यहूदातील नगरवासी इस्राएली यहूदी लोकांनीही आपली गुरे आणि शेळ्यामेंढ्या यांचा दहावा हिस्सा जमा केला. परमेश्वर देवाप्रीत्यर्थ आखून दिलेल्या जागेत धान्याच्याही राशी त्यांनी आणून ओतल्या. त्यांनी या सर्व वस्तूंचे ढीग रचले.
7 7 लोकांनी या सर्व वस्तू आणून टाकायला तिसऱ्या महिन्यात सुरुवात केली आणि सातव्या महिन्यात हे काम संपले.
8 8 राजा हिज्कीया आणि इतर सरदार यांनी जेव्हा या राशी पाहिल्या तेव्हा त्यांनी परमेश्वराला आणि इस्राएलच्या प्रजेला धन्यवाद दिले.
9 9 राजाने मग याजकांना आणि लेवींना या गोळा झालेल्या वस्तूंविषयी विचारले.
10 10 तेव्हा सादोकच्या घराण्यातला मुख्य याजक अजऱ्या हिज्कीयाला म्हणाला की, “लोक परमेश्वराच्या मंदिरात धान्य या सगळ्या गोष्टी अर्पण करायला लागल्यापासून आम्हाला पोटभर खायला मिळू लागले आहे. अगदी तृप्त होईपर्यंत खाऊनही एवढे उरले आहे. परमेश्वराने आपल्या प्रजेला खरोखरच दुवा दिला आहे, म्हणून तर इतके शिल्लक राहीले आहे.”
11 11 हिज्कीयाने मग याजकांना परमेश्वराच्या मंदिरात कोठारे तयार ठेवायला सांगितली. त्याची आज्ञा अंमलात आणली गेली.
12 12 याजकांनी परमेश्वरासाठी अर्पण केलेल्या वस्तू धान्याचा अथवा पशूंचा दहावा हिस्सा, इतर काही वाहिलेल्या गोष्टी आत आणल्या आणि मंदिरातील कोठारात जमा केल्या. कोनन्या लेवी हा या भांडारावरचा प्रमुख अधिकारी होता. शिमी त्याच्या हाताखाली होता. शिमी कोनन्याचा भाऊ होता.
13 13 यहीएल, अजऱ्या, नहथ, असाएल, यरीमोथ, योजाबाद, अलीएल, इस्मख्या, महथ बनाया यांच्यावर कोनन्या आणि शिमी या दोन भावांची देखरेख होती. राजा हिज्कीया आणि देवाच्या मंदिराचा प्रमुख अधिकारी अजऱ्या यांनी या माणसांची निवड केली.
14 14 लोकांनी देवाला स्वखुशीने अर्पण केलेल्या सगळ्या गोष्टींवर कोरेची देखरेख होती. परमेश्वराला वाहिलेल्या या गोष्टींचे वाटप करण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. तसेच परमेश्वराला आलेल्या पवित्र भेटवस्तूंची वाटणी करण्याचेही काम त्याचेच होते. कोरे पूर्वेकडच्या प्रवेशद्वाराचा द्वारपाल होता. त्यात्या वडलांचे नाव इम्नाना लेवी.
15 15 एदेन, मिन्यामीन, येशूवा, शमाया, अमऱ्या शखन्या हे कोरेचे मदतनीस होते. याजक राहात त्या नगरात ते निष्ठेने आपली सेवा रुजू करत. याजकांच्या प्रत्येक गटांमधील आपापल्या भाऊबंदांना त्यांच्या वाटणीचा हिस्सा देत. हे वाटप करताना ते लहान मोठा अशा सर्वानाच सारखाच भाग देतअसत.
16 16 लेवी घराण्याच्या इतिहासात ज्यांची नावे नोंदलेली होती असे, तीन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे जे लेवी पुरुष परमेश्वरच्या मंदिरात नेमून दिलेल्या दैनंदिन कामासाठी जात त्यांना त्यांची वाटणी हे मदतनीस देत. अशाप्राकरे लेवींच्या प्रत्येक गटाला काम नेमून दिलेले होते.
17 17 याजकांना त्यांच्या वाटणीचा हिस्सा मिळत असे. ज्या लेवींची आपापल्या पितृकुळाप्रमाणे नोंद झाली होती त्यांना आणि किमान वीस वर्षे किंवा त्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या लेवींना त्यांची वाटणी मिळत असे. त्यांच्यावरील जबाबदारीचे स्वरुप आणि त्यांचा गट यावर त्याचे प्रमाण ठरत. असे.
18 18 ज्या लेवींची वंशावळ्यांमध्ये नोदं झालेली होती त्या सर्वांच्या मुलाबाळांना, बायकांना मुलगे मुली यांनाही आपापली हिस्सा मिळे. परमेश्वराच्या सेवेसाठी ते नेहमीच शुचिर्भूत होऊन तप्तर असत म्हणून त्यांना हे दिले जाई.
19 19 अहरोन वंशातील काही याजकांची लेवी राहात असत त्या गावांमध्ये शेत - शिवारे होती. काही अहरोनचे वंशज नगरांमध्येही राहात होते. तेव्हा त्या नगरातील माणसांची नावानिशी निवड करुन त्यांना आपल्या उत्पन्नातला वाटा या अहरोवंशजांना द्यायला निवडले होते. वंशावळीत नोंदवलेले सर्वजण आणि पुरुष लेवी यांना हा वाटा मिळे.
20 20 राजा हिज्कीयाने अशाप्रकारे यहूदात चांगली कामगिरी केली. परमेश्वर देवाच्या दृष्टीने जे योग्य, बरोबर आणि सत्य ते त्याने केले.
21 21 हाती घेतलेल्या प्रत्येक कामात त्याला यश आले, उदाहरणार्थ, देवाच्या मंदिरातील उपासना, नियमशास्त्राचे पालन, परमेश्वराला शरण जाणे. हिज्कीयाने हे सर्व मनापासून केले.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×