Bible Versions
Bible Books

Deuteronomy 26 (MRV) Marathi Old BSI Version

1 “लौकरच तुम्ही तुमचा देव परमेश्वर तुम्हाला देणार असलेल्या प्रदेशात पाऊल टाकून तेथील जमिनीचा ताबा घेऊन, तेथे राहाल.
2 2 तेथील परमेश्वराने दिलेल्या शेतजमिनीचे सर्व उत्पन्न गोळा कराल. तेव्हा पहिले पीक टोपल्यात भरुन त्या घेऊन तुमचा देव परमेश्वर ह्याने निवडलेल्या त्याच्या पवित्र निवासस्थानी जा.
3 3 त्यावेळी जो याजक असेल त्याच्याकडे जाऊन सांगा की परमेश्वराने आमच्या पूर्वजांना आम्हांला जमीन देण्याचे वचन दिले होते. त्याप्रमाणे मी येथे पोहोंचलो आहे, हे सांगायला मी तुमचा देव परमेश्वर ह्याच्या दारी आलो आहे!
4 4 “मग तो याजक तुमच्या हातून ती टोपली घेईल. तुमचा देव परमेश्वर ह्याच्या वेदीसमोर तो ती खाली ठेवील.
5 5 तेव्हा तुम्ही तुमचा देव परमेश्वर ह्यासमोर असे म्हणावे, ‘आमचा पूर्वज हा भटकणारा अरामी होता, तो खाली मिसरमध्ये जाऊन राहिला. तिथे पोहोंचला तेव्हा त्याचा परिवार लहान होता. पण मिसरमध्ये त्याचे महान सामर्थ्यशाली राष्ट्र बनले.
6 6 तेथे मिसरी लोकांनी आम्हाला वाईट वागणूक दिली. आम्हाला गुलाम बनवले. जबरदस्तीने कष्टाच्या कामाला जुंपले छळ केला.
7 7 मग आम्ही परमेश्वर जो आमच्या पूर्वजांचा देव ह्याचा धावा केला. त्यांच्या बद्दलची गाऱ्हाणी सांगितली. परमेश्वराने आमचे ऐकले. त्याने आमचा त्रास, आमचे कष्ट आणि छळ त्याने पाहिले.
8 8 मग त्याने आपल्या प्रचंड सामर्थ्याने आम्हाला मिसरमधून बाहेर आणले. तेव्हा त्याने मोठे चमत्कार प्रताप दाखवले आणि उत्पात घडवले.
9 9 आणि येथे आम्हाला आणून ही दुधामधाचे पाट वाहणारी भूमी आम्हाला दिली.
10 10 आता हे परमेश्वरा, त्या भूमीतील पहिले उत्पन्न आम्ही आणले आहे.’“मग तो उत्पन्नाचा वाटा परमेश्वरासमोर ठेवून परमेश्वराला वंदन करा.
11 11 त्यानंतर सर्वजण एकत्र भोजन करा. तुम्हाला तुमच्या कुटुंबियांना तुमचा देव परमेश्वर ह्याच्या कृपेने जे जे चांगले मिळाले त्याबद्दल आनंद व्यक्त करा. यात लेवी आणि गावातील परकीय यांनाही सामील करुन घ्या.
12 12 “दर तिसरे वर्ष हे दशांश देण्याचे वर्ष होय. यावर्षी आपल्या उत्पन्नाचा दहावा हिस्सा लेवी, गावातील परकीय विधवा अनाथ यांना द्या म्हणजे तेही तृप्त होतील.
13 13 या वेळी तुमचा देव परमेश्वर ह्याला सांगा की माझ्या घरातून मी हा उत्पन्नाचा पवित्र हिस्सा आणला आहे. लेवी, परकीय, विधवा, अनाथ या सर्वांना द्यायचे ते मी दिले आहे. तुझ्या सर्व आज्ञांचे चुकता पालन केले आहे. कोणत्याही आज्ञेचे उल्लंघन केलेले नाही.
14 14 मी दु:खीमन:स्थितीत यातील काही खाल्लेले नाही. तसेच अशुद्ध असताना यातील काही खाल्लेले नाही. मृतांना यातील काही अर्पण केले नाही. मी तुझे ऐकले आहे. तुझ्या आज्ञांप्रमाणे वागलो आहे.
15 15 आता तू तुझ्या पवित्र निवासस्थानातून, स्वर्गातून आम्हा इस्राएल लोकांना आशीर्वाद दे. आम्हाला दिलेल्या भूमिला आशीर्वाद दे. ही दुधामधाची रेलचेल असलेली भूमी आम्हाला द्यायचे तू आमच्या पूर्वजांना कबूल केले होतेस.
16 16 “तुम्ही हे सर्व नियम विधी पाळावे अशी तुमचा देव परमेश्वर ह्याची तुम्हाला आज आज्ञा आहे. ते सर्व तुम्ही मन:पूर्वक पाळा.
17 17 परमेश्वर हाच तुमचा देव असे आज तुम्ही म्हणाला आहात. त्याच्या मार्गाने चालायचे तुम्ही मान्य केले आहे. त्याच्या शिकवणीनुसार वागायचे त्याचे नियम आज्ञा पाळायचे तुम्ही वचन दिले आहे. तो जे जे सांगेल त्याप्रमाणे आचरण ठेवायचे तुम्ही कबूल केले आहे.
18 18 परमेश्वराने आज तुम्हाला पूर्वी सांगितल्याप्रमाणे आपली खास प्रजा म्हणून आपलेसे केले आहे. माझ्या सर्व आज्ञा पाळाव्या असेही तुम्हाला त्याने सांगितले आहे.
19 19 इतर सर्व राष्ट्रांपेक्षा तो तुम्हाला महान करणार आहे. तो तुम्हाला प्रशंसा, नावलौकिक, सन्मान बहाल करील. आणि त्याच्याच सांगण्याप्रमाणे तुम्ही त्याची खास प्रजा व्हाल.”
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×