Bible Versions
Bible Books

Ezekiel 47 (MRV) Marathi Old BSI Version

1 त्या माणसाने मला पुन्हा मंदिराच्या दाराशी नेले. मंदिराच्या पूर्वेकडील उंबऱ्याच्या खालून पाणी वाहताना मला दिसले (मंदिराचे तोंड पूर्वेला होते.) मंदिराच्या दक्षिणेच्या भागाखालून पाणी वेदीच्या दक्षिणबाजूने वाहात होते.
2 2 त्या माणसाने मला उत्तरेच्या दाराने बाहेर आणले आणि फिरवून पूर्वेकडील बाहेरच्या दाराकडे नेले. पाणी दाराच्या दक्षिणेकडून येत होते.
3 3 हातात मोजमापाची फीत घेऊन तो माणूस पूर्वेला गेला. त्याने 1000 हात (1/3 मैल) अंतर मोजले मग त्याने मला त्या अंतरापर्यंत पाण्यातून जायला सांगितले. पाणी फक्त घोट्यापर्यंत होते.
4 4 मग त्याने आणखी 1000 हाताचे (1/3 मैलाचे) अंतर मोजले. पुन्हा मला पाण्यातून तेथपर्यंत चालण्यास सांगितले. तेथे पाणी माझ्या गुडघ्यापर्यंत आले. मग त्याने पुन्हा 1000 हाताचे (1/3 मैलाचे) अंतर मोजून, तेथपर्यंत मला पाण्यातून चालण्यास सांगितले. तेथे पाणी कमरेइतक्या खोलीचे होते.
5 5 त्या माणसाने पुढे आणखी 1000 हात (1/3 मैल) अंतर मोजले. पण येथे पाणी खूपच खोल असल्याने त्यातून चालणे शक्य नव्हते. त्याची नदी झाली होती. पाणी पोहता येईल इतके खोल होते. पार करता येणार नाही इतक्या खोलीची ती नदी होती.
6 6 तो माणूस मला म्हणाला, “मानवपुत्रा, तुला दिसलेल्या गोष्टी तू लक्षपूर्वक पाहिल्यास ना?”मग त्याने मला नदीच्या काठाने परत आणले.
7 7 नदीच्या काठाने परत येताना नदीच्या दोन्ही तीरांवर मला दाट झाडी दिसली.
8 8 तो माणूस मला म्हणाला, “हे पाणी पूर्वेला वाहते. हे अरब दरीतून जाऊन मृत समुद्राला मिळते. त्यामुळे त्या समुद्राचे पाणी ताजे होते.
9 9 हे पाणी मृत समुद्राला मिळत असल्याने तेथील पाणी ताजे स्वच्छ होते. तेथे खूप मासे मिळतात. ह्या नदीकाठच्या प्रदेशात सर्व प्रकारचे प्राणी आहेत.
10 10 एन-गेदीपासून एन-इग्लाइमपर्यंत तुला मच्छीमार नदीकाठी उभे असलेले दिसू शकतील. आपापली जाळी टाकून अनेक प्रकारचे मासे ते पकडत असल्याचे तुला दिसेल. भूमध्य समुद्रात जितक्या प्रकारचे मासे आहेत, तितक्याच प्रकारचे मासे मृतसमुद्रात आहेत.
11 11 पण दलदल आणि पाणथळीच्या लहान लहान जागा मिठासाठी तशाच ठेवल्या जातील.
12 12">नदीच्या दोन्ही काठावर सर्व प्रकाराची फळझाडे वाढतात. त्यांची पाने कधीच सुकून गळत नाहीत. त्या झाडांवर नेहमीच फळे असतात. दर महिन्याला झाडांना बहर येतो का? कारण झाडांना मंदिरातून येणारे पाणी मिळते. झाडांची फळे खाण्यासाठी उपयोगी पडतील पाने औषधी असतील.”
13 13 परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो “इस्राएलच्या बारा वंशासाठी जमिनीची विभागणी पुढीलप्रमाणे होईल. योसेफाला दोन भाग मिळतील.
14 14 तुम्ही जागेची सारखी वाटणी कराल. मी तुमच्या पूर्वजांना ही जमीन देण्याचे कबूल केले होते. म्हणून मी ती तुम्हाला देत आहे.
15 15 “जमिनीच्या सीमा अशा असतील. उत्तरेला भूमध्य समुद्रापासून, हेथलोनच्या बाजूने हमाथकडे रस्ता वळतो तेथपर्यंत आणि पुढे सदाद,
16 16 बेरोथा, सिब्राईम (जे दिमिष्क हमाथ यांच्या सीमेवर आहे.) हासेर - हत्तीकोन (जे हौरानच्या सीमेवर आहे.) हासेर - हत्तीकोने (जे हौरानच्या सीमेवर आहे.) येथपर्यंत.
17 17 म्हणजेच उत्तरेची सीमा समुद्रापासून, दिमिष्क हमाथ यांच्या उत्तरसीमेवर असलेल्या हसर-एनोनपर्यंत असेल.
18 18 “पूर्वेला सीमारेषा हसर-एनोनपासून हौरान दिमिष्कमधून. पुढे यार्देन नदीच्या कडेने गिलाद इस्राएलच्या मधून पूर्व समुद्राच्या पुढे पार तामारपर्यंत जाईल.
19 19 “दक्षिणेला तामारपासून पार मेरीबोथ - कादेशच्या हिरवळीच्या प्रदेशा पलीकडे मिसरच्या ओढ्याच्या पुढे भूमध्य समुद्रापर्यंत सीमा असेल.
20 20 “पश्र्चिमेला अगदी लेबो-हामाथपर्यंतचा भूमध्य समुद्र हीच सीमा असेल.
21 21 “तेव्हा तुम्ही ही जमीन इस्राएलच्या वंशांमध्ये आपापासात वाटाल.
22 22 तुम्ही तुमच्यात आणि तुमच्यामध्ये राहात असलेल्या परक्यांमध्ये अथवा ज्या परक्यांची मुले तुमच्यात राहात आहेत त्यांच्यात वाटाल. हे परके इस्राएलमध्ये जन्मलेल्या लोकांप्रमाणेच इस्राएलचे रहिवासी आहेत. त्यामुळे इस्राएलच्या वंशांना दिलेल्या जमिनीतील काही भाग तुम्ही ह्या लोकांना द्यावा.
23 23 हे परके जेथे राहतात, तेथे राहणाऱ्या इस्राएलींनी त्यांना काही जमीन दिलीच पाहिजे.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×