Bible Versions
Bible Books

2 Chronicles 28 (MRV) Marathi Old BSI Version

1 आहाज राजा झाला तेव्हा वीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेममध्ये सोळा वर्षे राज्य केले. आपला पूर्वज दावीद वागला तसे आहाजचे वर्तन नव्हते. त्याचे आचरण परमेश्वराला मान्य होणारे नव्हते.
2 इस्राएलच्या राजांच्या दुर्वर्तनाचा त्याने कित्ता गिरवला. त्याने बआल देवतेच्या ओतीव मूर्ती पूजेसाठी केल्या.
3 बेन हिन्नोमच्या खोऱ्यात त्याने धूप जाळला. आपल्या पोटच्या मुलांना त्याने अग्नीमध्ये आहूती करुन बळी दिले. या प्रदेशात राहणारे लोक जे भयंकर पाप करीत तेच त्याने केले. इस्राएल लोकांनी या भूमीवर पाऊल ठेवले तेव्हा परमेश्वराने त्या लोकांना तिथून घालवले होते.
4 आहाजने उंच स्थानी, डोंगरावर तसेच प्रत्येक हिरव्यागार वृक्षाखाली यज्ञ केले आणि धूप जाळला.
5 आहाजच्या या पापांमुळे परमेश्वर देवाने अरामच्या राजाच्या हातून आहाजचा पराभव करविला. अरामच्या राजाने त्याच्या सैन्याने आहाजचा पाडाव करुन यहूदाच्या लोकांना कैद केले दिमिष्काला नेले. इस्राएलचा राजा पेकह याच्याकडूनही परमेश्वराने आहाजचा पराभव करवला. पेकहच्या वडलांचे नाव रमाल्या. पेकहच्या सैन्याने एका दिवसात यहूदाचे 1, 20 ,000 शूर सैनिक ठार केले. आपले पूर्वज ज्या परमेश्वर देवाला शरण गेले त्या परमेश्वराची साथ सोडल्यामुळे यहूदी लोकांचा असा पराभव झाला.
6
7 जिख्री हा एफ्राइममधला एक शूर योध्दा. त्याने राजा आहाजचा मुलगा मासेया, राजमहालाचा प्रमुख कारभारी अज्रीकाम आणि राजाच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचा अधिकारी एलकाना यांना ठार मारले.
8 इस्राएलच्या सैन्याने यहूदात राहणाऱ्या 2,00,000 जणांना पकडून नेले. हे सर्व त्यांचे नातलगच होते. या कैद्यांमध्ये बायका मुलेही होती. तसेच यहूदातील किंमती वस्तूही लुटून नेल्या. ही लूट आणि बंदिवान यांना ताब्यात घेऊन ते शोमरोन या नगरात आले.
9 तिथे ओदेद नावाचा परमेश्वराचा एक संदेष्टा होता. शोमरोनला आलेल्या इस्राएली सैन्याला तो भेटला. ओदेद त्यांना म्हणाला, “तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्यामुळे तुम्ही यहूदी लोकांचा पराभव करु शकलात कारण परमेश्वराचा यहूद्यांवर कोप झाला होता. पण तुम्ही अतिशय नीच पध्दतीने यहूद्यांना मारलेत, त्यांना शासन केलेत. त्यामुळे आता परमेश्वराच्या कोधाचा रोख तुमच्यावर आहे.
10 यहूदाच्या यरुशलेमच्या लोकांना गुलाम करण्याचा तुमचा मानस आहे. परमेश्वराच्या दृष्टीने तुम्ही हे पाप केले आहे.
11 आता माझे ऐका. पकडून आणलेल्या या आपल्या भावाबहिणींना परत पाठवून द्या. परमेश्वराला तुमचा अनावर संताप आला आहे.”
12 एफ्राइमच्या काही प्रमुख मंडळींनी इस्राएलच्या सैनिकांना लढाईवरुन परतताना पाहिले. तेव्हा या प्रमुखांनी सैनिकांना भेटून चांगली समज दिली. योहानानचा मुलगा अजऱ्या, मशिल्लेमोथचा मुलगा बरेख्या, शल्लूमचा मुलगा यहिज्कीया, आणि हदलाईचा मुलगा अमास ही ती नेते मंडळी होत.
13 ती इस्राएली सैन्याला म्हणाली, “यहूदाच्या कैद्यांना इकडे आणू नका. तसे केलेत तर तो परमेश्वराचा आपण केलेला मोठा अपराध ठरेल. आपल्या पापांमध्ये त्यामुळे आणखी भर पडेल. इस्राएलवर परमेश्वराचा कोप होईल.”
14 तेव्हा त्या सैनिकांनी कैदी आणि लुटलेली चीजवस्तू हे इस्राएल लोकांच्या आणि त्या प्रमुखांच्या हवाली केले.
15 तेव्हा अजऱ्या, बरेख्या, यहिज्कीया आणि अमासा यांनी पुढे होऊन कैद्यांना जवळ केले. त्यांतील उघड्या नागड्या लोकांना त्यांनी लुटीतले कपडेलत्ते दिले. जे अनवाणी होते त्यांना पादत्राणे दिली. त्या सर्वांना त्यांनी खाऊ पिऊ घातले. मर्दनासाठी तेल दिले. एवढे झाल्यावर या प्रमुखांनी चालायचे त्राण नसलेल्या कैद्यांना गाढवावर बसवले आणि या सर्वांना त्यांनी यरीहो या त्यांच्या गावी घरी नेऊन सोडले. यरीहोला खजुरीच्या झाडांचे नगर असेही म्हणतात. मग ही चार वडीलधारी मंडळी शोमरोनला परतली.
16 याचवेळी अदोमच्या लोकांनी यहूदावर चढाई करुन त्यांचा पाडाव केला. अदोम्यांनी यहूदी लोकांना कैद करुन नेले. तेव्हा राजा आहाजने अश्शूरच्या राजाकडे मदत मागितली.
17
18 पलिष्ट्यांनीही डोंगराळ तळवटीच्या भागातल्या गावांवर आणि दक्षिण यहूदावर हल्ला केला. बेथ - शेमेश, अयालोन, खदेरोथ, सोखो, तिम्ना आणि गिम्जो ही गावे त्यांच्या आसपासच्या खेड्यांसह काबीज केली.
19 परमेश्वराने यहूदाला संकटांनी जेरीला आणले कारण यहूदाचा राजा आहाज याने यहूद्यांना दुर्वर्तनाला प्रवृत्त केले होते. आहाजने परमेश्वराचे उल्लंघन केले होते.
20 तिल्गथ - पिल्नेसर हा अश्शूराचा राजा. यानेही आहाजला मदत करण्याऐवजी त्रासच दिला.
21 आहाजने परमेश्वराच्या मंदिरातील, राजमहालातील तसेच सरदारांच्या घरातील धनदौलत घेऊन अश्शूरच्या राजाला दिली पण त्याचाही फायदा झाला नाही.
22 या संकटकाळात आहाजच्या दुर्वर्तनात आणखी भरच पडली. तो परमेश्वरापासून दुरावला.
23 दिमिष्काच्या लोकांच्या दैवतांसाठी त्याने यज्ञ केले. या दिमिष्कांनी त्याला हरवले होते. तेव्हा त्याने विचार केला, “अरामचे लोक ज्या देवाची पूजा करतात ते देव त्यांना साहाय्य करतात. तेव्हा मी ही त्यांच्यासाठी यज्ञ केले तर ते मला सोडवतील.” म्हणून आहाज त्या दैवतांना शरण गेला. त्याच्या या कृत्यांमुळेच त्याचा आणि इस्राएल लोकांचा नाश होत गेला.
24 आहाजने देवाच्या मंदिरातली सगळी उपकरणी गोळा करुन त्यांची मोडतोड करुन विल्हेवाट लावली. परमेश्वराच्या मंदिराची दारे त्याने बंद करुन घेतली. वेद्या केल्या आणि त्या यरुशलेममध्ये चौका चौकात बसवल्या.
25 यहूदातील सर्व गावांमध्ये इतर देवतांच्या पूजेला धूप जाळण्यासाठी म्हणून उंच स्थाने केली. अशाप्रकारे वागून आपल्या पूर्वजांच्या परमेश्वर देवाचा त्याने क्रोध ओढवून घेतला.
26 आहाजच्या बाकीच्या गोष्टी आणि त्याचे सुरुवातीपासून शेवटपर्यंतचे आचरण ‘यहूदा इस्राएल राजांचा इतिहास’ या पुस्तकात लिहिलेले आहे.
27 आहाज मरण पावला आणि त्याच्या पूर्वजांशेजारी त्याचे दफन झाले. यरुशलेम नगरात लोकांनी त्याला पुरले. पण इस्राएलच्या इतर राजांचे जेथे दफन झाले त्या जागी मात्र नव्हे. आहाजचा मुलगा हिज्कीया हा पुढे राजा झाला.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×