Bible Versions
Bible Books

Jeremiah 16 (MRV) Marathi Old BSI Version

1 मला परमेश्वराचा संदेश आला:
2 2 “यिर्मया, तू लग्न करता कामा नये. या ठिकाणी तुला मुले होता कामा नयेत”
3 3 यहूदामध्ये जन्मणाऱ्या मुलांबद्दल आणि त्यांच्या आईवडिलांबद्दल परमेश्वर पुढील गोष्टी सांगतो,
4 4 “त्या लोकांना भयंकर वाईट प्रकारे मृत्यू येईल. त्यांच्यासाठी कोणीही शोक करणार नाही. त्यांचे कोणीही दफन करणार नाही. त्यांची प्रेते शेणाप्रमाणे जमिनीवर उघडी पडतील. ते लोक शत्रूकडून मारले जातील वा उपासमारीने मरतील. त्यांची प्रेते पक्षी वन्य प्राणी ह्यांचे भक्ष्य होतील.”
5 5 म्हणून परमेश्वर म्हणतो, “यिर्मया, ज्या घरी लोक अंत्यसंस्कारानंतर जेवण करीत असतील, त्या घरी तू जाऊ नकोस. तेथे गेलेल्यासाठी शोक वा दु:ख प्रदर्शित करायला जाऊ नकोस. ह्या गोष्टी तू करु नकोस. का? कारण मी माझा आशीर्वाद मागे घेतला आहे. ह्या लोकांबद्दल मला दया वाटणार नाही. मला त्यांच्याबद्दल दु:ख होणार नाही.” हा परमेश्वराचा संदेश आहे.
6 6 “यहूदामध्ये महत्वाचे आणि सामान्य दोघेही मरतील. त्यांचे कोणी दफन करणार नाही. अथवा त्यांच्याबद्दल शोक करणार नाही. कोणीही दाढी करुन वा मुंडन करुन त्यांच्यासाठी शोक प्रदर्शित करणार नाही.
7 7 मृतांबद्दल शोक करणाऱ्यांसाठी कोणीही अन्न आणणार नाही. ज्यांचे आईवडील गेले आहेत, त्यांचे कोणी सांत्वन करणार नाही. मृतांसाठी शोक करणाऱ्यांसाठी, कोणीही पेये आणून सांत्वन करणार नाही.
8 8 “यिर्मया, ज्या घरात मेजवानी सुरु आहे, अशा घरात तू जाऊ, नकोस, अशा घरात खाऊ पिऊ नकोस.
9 9 सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, ‘मी लवकरच लोकांचा जल्लोश बंद पाडीन. लग्नसमारंभातील आनंदकल्लोळ मी बंद करीन. तुझ्या आयुष्यातच हे घडेल, इतक्या लवकर मी हे सर्व करीन.’
10 10 “यिर्मया, यहूदाच्या लोकांना तू ह्या गोष्टी सांग लोक तुला विचारतील ‘परमेश्वराने आमच्याबद्दल या भयंकर गोष्टी का सांगितल्या? आम्ही काय चूक केली? आम्ही आमच्या परमेश्वर देवाचे काय पाप केले?’
11 11 तेव्हा तू त्यांना हे सांगितलेच पाहिजेस, ‘तुमच्या पूर्वजांनी परमेश्वराला अनुसरायचे सोडल्याबद्दल ह्या भयंकर गोष्टी घडतील.’ हा देवाचा संदेश आहे. ‘त्यांनी दैवतांची पूजा केली. तुमच्या पूर्वजांनी माझा त्याग केला आणि माझ्या आदेशांचे पालन करणे सोडले.
12 12 पण तुमच्या पूर्वजांपेक्षा तुम्ही वाईट पापे केलीत. तुम्ही फार हटवादी आहात. तुम्हाला वाटेल ते तुम्ही करता. माझ्या आज्ञा पाळत नाही. तुमचेच खरे करता.
13 13 म्हणून मी तुम्हाला देशाबाहेर हाकलीन. तुम्हाला परदेशात जाणे भाग पाडीन, तुम्हाला किंवा तुमच्या पूर्वजांनासुद्धा माहीत नसलेल्या देशांत तुम्ही जाल. त्या देशात, तुमच्या इच्छेप्रमाणे शत्रदिवस खोट्या देवांची सेवा तुम्ही करु शकाल, मी तुम्हाला मदतही करणार नाही किंवा तुमच्यावर कृपाही करणार नाही.’
14 14 “आपल्या वचनाची खात्री देताना लोक म्हणतात ‘परमेश्वराचे अस्तित्व जेवढे खरे आहे, तेवढे आपले वचन पक्के आहे. मिसरच्या भूमीतून इस्राएलच्या लोकांची सुटका त्या परमेश्वरानेच केली आहे.’ पण आता देवाचा असा संदेश आहे, ‘लोक वर म्हटल्याप्रमाणे म्हणणार नाहीत. असा काळ येऊ घातलेला आहे.
15 15 लोक काहीतरी नवीनच म्हणतील, ‘त्या परमेश्वराचे अस्तित्व खात्रीचे आहे, ज्याने इस्राएलच्या लोकांची उत्तरेतील प्रदेशातून सुटका केली.’ त्यांना निरनिराळ्या प्रदेशांत पाठवून तेथून त्यांना परत आणणारा तोच एकमेव आहे’ ते असे का म्हणतील? कारण इस्राएलच्या लोकांना मी त्याच्या पूर्वजांना दिलेल्या भूमीत परत आणीन.
16 16 “लवकरच मी पुष्कळ कोळ्यांना येथे बोलावीन.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “ते कोळी यहूदाच्या लोकांना पकडतील असे झाल्यावर मी पुष्कळ शिकाऱ्यांना आणीन. ते शिकारी प्रत्येक डोंगर, टेकड्या कपारी यांमधून यहूदाच्या लोकांची शिकार करतील.
17 17 त्यांची प्रत्येक कृती मला दिसते. यहूदाचे लोक त्यांची कृत्ये माझ्यापासून लपवू शकत नाहीत. त्यांचे पाप माझ्यापासून लपून राहात नाही.
18 18 ती यहूदाच्या लोकांना त्यांच्या दुष्कृत्यांबद्दल परत फेड करीन. मी यहूदाच्या लोकांना त्याच्या पापांची किंमत दामदुपटीने मोजायला लावीन. त्यांनी माझी भूमी ‘अपवित्र’ केली म्हणून मी असे करीन. त्यांनी भयानक मूर्ती स्थापून माझी भूमी कलंकित केली. मी त्या मूर्तींचा तिरस्कार करतो. पण त्यांनी माझा देशच त्या मूर्तींनी भरुन टाकला.”
19 19 परमेश्वरा, तूच माझे सामर्थ्य आहेस आणि माझे संरक्षण आहेस. संकटकाळी धावत जाऊन आश्रय घ्यावा असे सुरक्षित स्थान तू आहेस. जगाच्या सर्व भागांतून राष्ट्रे तुझ्याकडे येतील. ते म्हणतील, “आमच्या वाडवडिलांनी खोटे देव जवळ बाळगले. त्या दीडदमडीच्या मूर्तींची पूजा केली. पण त्या मूर्तींनी त्यांना काहीही मदत केली नाही.”
20 20 लोक स्वत:साठी खरा देव निर्माण करु शकतात का? नाही. ते फक्त मूर्ती तयार करु शकतात. पण त्या मूर्ती म्हणजे खरे देव नव्हेत.
21 21 परमेश्वर म्हणतो “म्हणून त्या मूर्ती बनविणाऱ्या लोकांना मी धडा शिकवीन. प्रथम मी त्यांना माझ्या शक्तीची सामर्थ्याची जाणीव करुन देईन. मग त्यांना कळेल की मीच खरा देव, मीच खरा परमेश्वर आहे.”
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×