Bible Books

:
-

1. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे उठून यहोशवा सर्व इस्राएल लोकांसह अकाशियाहून (अथवा शिट्टिमाहून) निघून यार्देन नदीपर्येत आला. नदी पार करण्यापूर्वी त्यांनी तेथे मुक्काम केला.
2. तीन दिवसांनंतर अधिकारी छावणीतून फिरले.
3. त्यांनी लोकांना आज्ञा दिल्या. ते म्हणाले, “लेवी याजक तुमच्या परमेश्वर देवाच्या कराराचा कोश वाहून नेताना तुम्हाला दिसतील तेव्हा त्यांच्या पाठोपाठ जा.
4. पण फार जवळून जाऊ नका. त्यांच्या पासून सुमारे एक हजार यार्ड अंतर ठेवा. या पूर्वी कधी या वाटेने तुम्ही गेला नाहीत. तेव्हा ती कळावी म्हणून त्यांच्या मागून जा.”
5. मग यहोशवा लोकांना म्हणाला, “शुचिर्भूत आणि पवित्र व्हा कारण उद्या परमेश्वर तुमच्यामार्फत अद्भुत गोष्टी करणार आहे.”
6. मग याजकांना यहोशवाने कराराचा कोश घेऊन सर्वांच्या आधी जायला सांगितले. तेव्हा याजकांनी कोश उचलला ते सर्वांपुढे चालत निघाले.
7. परमेश्वर तेव्हा यहोशवाला म्हणाला, “आज मी सर्व इस्राएल लोकांच्या दृष्टीने तुझी थोरवी वाढविण्यास सुरूवात करीन. म्हणजे मग मोशेला मी साथ दिली तशीच तुलाही देणार आहे हे लोकांना कळेल.
8. याजक कराराचा कोश वाहून नेतील. त्यांना सांग यार्देन नदीच्या किनाऱ्यापर्यंत जा आणि प्रवाहात थांबा.”
9. यहोशवा मग इस्राएल लोकांना म्हणाला, “इकडे या आणि आपल्या परमेश्वराची वचने लक्षपूर्वक ऐका.
10. देव आपल्या संगती आहे याची ती साक्ष होय. तो कनानी, हिती, हिव्वी, परिज्जी, गिर्गाशी अमोरी यबूसी या आपल्या शत्रूंचा खात्रीने पराभव करील. त्यांना त्या प्रदेशातून हुसकावून लावील.
11. तुम्ही यार्देन पार करत असताना या परमेश्राच्या कराराचा कोश तुमच्या समोर असेल.
12. आता, प्रत्येक कुळातील एक याप्रमाणे इस्राएल लोकांच्या बारा कुळातून बारा जणांची निवड करा.
13. याजक परमेश्वराच्या कराराचा कोश वाहतील. परमेश्वर म्हणजे साऱ्या विश्वाचा मालक होय. यार्देन नदीतून तुमच्यापुढे तो कोश नेतील. जेव्हा त्यांच्या टाचा नदीच्या प्रवाहाला स्पर्श करतील तेव्हा प्रवाह वाहायचा थांबेल. पाणी आहे त्याठिकाणी थांबून मागच्या मागे धरणाप्रमाणे अडवले जाईल.”
14. कराराचा कोश वाहणारे याजक निघाले आणि नदी पार करून जाण्यासाठी सर्व लोकांनी मुक्काम हलवला. त्या लोकांनी यार्देन नदी पार करायला सुरूवात केली.
15. (सुगीच्या दिवसात यार्देन दुथडी भरून वाहात असते त्याप्रमाणे तिचा प्रवाह फुगलेला होता.) कोश वाहणारे याजक नदीकाठी आले. त्यांनी पाण्यात पाऊल टाकले.
16. आणि लगेच पाणी वाहायचे थांबले. पाण्याची जणू भिंत होऊन ते मागे अडवले गेले. थेट आदाम (सारातान जवळचे एक नगर) नगरापर्यंत पाणी सर्वदूर साठून राहिले. यरीहोजवळ लोकांनी नदी पार केली.
17. तेथील जमीन कोरडी झाली. याजक परमेश्वराच्या कराराचा कोश घेऊन नदीच्या मध्यावर आले थांबले. सर्व इस्राएल लोक कोरड्या जमिनीवरून यार्देन पलीकडे निघून जाईपर्यंत ते तिथेच थांबले.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×