Bible Books

:

1. पण इस्राएल लोकांनी परमेश्वराचे ऐकले नाही. यहूदाच्या वंशातील झिम्रीचा नातू कर्मीचा मुलगा आखान याने काही वस्तू स्वत:साठी ठेवून घेतल्या. त्या नष्ट करून टाकल्या नाहीत. तेव्हा परमेश्वराचा इस्राएल लोकांवर कोप झाला.
2. यरीहोचा पाडाव केल्यावर यहोशवाने काही माणसे आय येथे पाठवली. आय नगर बेथेलच्या पूर्वेला बेथ-आवेन जवळ होते. तेथे जाऊन त्या प्रांतातील कच्चे दुवे हेरायला त्याने त्यांना सांगितले. त्याप्रमाणे हेर तिकडे गेले.
3. नंतर ते यहोशवाकडे परतून आले. ते म्हणाले, “आय हा दुर्बल प्रांत आहे. तेव्हा सर्वांनी तेथे जाण्याची गरज नाही दोन-तीन हजार माणसे तेथे लढायला पुरेशी होतील. सर्व सैन्य लागणार नाही. कारण ते लोक थोडे आहेत.”
4. (4-5) तेव्हा सुमारे तीन हजार माणसे आय येथे गेली. आयच्या लोकांनी इस्राएलांची सुमारे छत्तीस माणसे ठार केली. आणि इस्राएल लोकांनी पळ काढला. त्यांचा आयच्या लोकांनी गावाच्या वेशीपासून ते दगडाच्या खाणीपर्यंत पाठलाग केला. आयच्या लोकांनी त्यांना चांगले चोपून काढले.इस्राएल लोकांनी हे पाहिले तेव्हा घाबरून त्यांच्या तोंडचे पाणी पळाले.
5.
6. यहोशवाने हे ऐकले तेव्हा दु:खाने त्याने आपली वस्त्रे फाडली. पवित्र करार कोशापुढे त्याने लोटांगण घातले. संध्याकाळपर्यंत तो तसाच पडून राहिला. इस्राएलच्या प्रमुखांनीही तसेच केले. दु:खाने, त्यांनीही आपल्या डोक्यात माती घालून घेतली.
7. यहोशवा म्हणाला, “हे प्रभू परमेश्वारा आम्हाला तू यार्देन पार करून आणलेस. अमोऱ्यांच्या हातून आमाचा नाश व्हायला का आम्हाला येथपर्यंत आणलेस? नदीच्या त्या तीरावरच आम्ही सुखासमाधानाने राहिलो असतो.
8. परमेश्वरा मी माझ्या जिवाची शपथ घेतो. मला आता बोलण्यासारखे काही उरले नाही. इस्राएल शत्रूला शरण गेला आहे.
9. “आता कनानी तसेच या देशातील इतर लोक हे ऐकतील. आणि आमच्यावर हल्ला करून आम्हाला ठार करतील. तेव्हा आपले नाव राखण्यासाठी तू काय करणार आहेस?”
10. परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “तू असा जमिनीवर पालथा का पडला आहेस? ऊठ उभा राहा.
11. इस्राएल लोकांनी पाप केले आहे. त्यांनी आज्ञाभंग करून माझ्याशी केलेला करार मोडला आहे. मी नष्ट करून टाकायाला सांगितलेल्या वस्तूपैकी काही त्यांनी ठेवून घेतल्या आहेत. त्यांनी चोरी केली आहे. खोटे बोलून त्यांनी त्या स्वत:साठी ठेवल्या आहेत.
12. म्हणून इस्राएलाच्या सैन्याने युध्दात पाठ फिरवून पळ काढला. त्यांच्या हातून चूक घडल्यामुळे ते असे वागले. त्यांचा संहारच केला पाहिजे. मी आता तुम्हाला मदत करणार नाही. मी सांगितले ते सर्व नष्ट करून टाकल्याशिवाय मी तुम्हाला साथ देणार नाही.
13. आता जा आणि लोकांना शुध्द कर त्यांना सांग “शुध्द व्हा. उद्याची तयारी करा. नष्ट करायला सांगितलेल्या वस्तू काही जणांनी ठेवून घेतल्या आहेत असे इस्राएलच्या परमेश्वर देवाचे म्हणणे आहे. त्या वस्तूंचा त्याग केल्याखेरीज तुम्हाला शत्रूचा पराभव करता येणार नाही.”
14. “उद्या सकाळी सर्वजण परमेश्वरासमोर उभे राहा. सर्व वंशांच्या लोकांनी परमेश्वरासमोर यावे. मग परमेश्वर एका वंशातील लोकांना निवडील. तेव्हा त्यांनीच फक्त पुढे यावे त्यातील एका कुळाची निवड करील. तेव्हा फक्त त्या कुळातील लोकांनी परमेश्वराला सामोरे जावे. मग त्या कुळातील प्रत्येक कुटुंबावर परमेश्वर दृष्टिक्षेप टाकील आणि एका कुटुंबाला निवडील. मग त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीकडे परमेश्वर पाहील.
15. नष्ट करून टाकायला पाहिजे होती अशी वस्तू त्याच्याकडे सापडल्यास तो पकडला जाईल. तेव्हा त्या माणसाला जाळून टाकावे. तसेच त्यच्याकडे असलेले सर्व काही त्याच्याबरोबर आगीत टाकावे. या माणसाने परमेश्वराचा करार मोडून इस्राएल लोकांना कलंक लावणारी गोष्ट केली आहे.”’
16. दुसऱ्या दिवशी पहाटे यहोशवाने सर्व इस्राएल लोकांना परमेश्वरासमोर आणले. सर्व वंशांचे लोक परमेश्वरापुढे उभे राहिले. परमेश्वराने यहूदाच्या वंशाची निवड केली.
17. तेव्हा यहूदाचे एकेक कूळ परमेश्वरापुढे हजर झाले. त्यातून परमेश्वराने जेरहाचे कूळ निवडले. जेरहाच्या कुळातील सर्व कुटुंबे परमेश्वरापुढे आली तेव्हा झिम्रीचे कुटुंब पकडले गेले.
18. मग यहोशवाने या कुटुंबातील सर्व पुरूषांना परमेश्वरापुढे हजर व्हायला सांगितले. परमेश्वराने कर्मीचा मुलगा आखान याला पकडले (कर्मी झिम्रीचा मुलगा झिम्री जेरहाचा)
19. मग यहोशवा आखानला म्हणाला, “मुला, आता प्रार्थना कर. इस्राएलांच्या परमेश्वर देवाचा मान राखून आपली पापे त्याच्यापुढे कबूल कर. आता काहीही लपवून ठेवता तू काय केलेस ते मला सांग.”
20. आखान म्हणाला, “हे खरे आहे. इस्राएलच्या परमेश्वर देवाविरूध्द वागून मी पाप केले आहे. मी केले ते असे.
21. यरीहो नगर आणि त्यातील सर्व मालमात्ता काबीज केल्यावर मी एक सुंदर शिनारी (बबिलोनियन) अंगरखा, अंदाजे पाच पौंड चांदी आणि जवळापास एक पौड सोन्याची वीट पाहिली. त्याचा मला मोह पडला त्या वस्तू मी घेतल्या. माझ्या तंबूत या गोष्टी जमिनीत पुरून ठेवलेल्या तुम्हाला सापडतील. चांदी अंगरख्याखाली दडवलेली आहे.”
22. तेव्हा यहोशवाने काही माणसे तंबूकडे पाठवली. ती धावतच तेथे गेली आणि त्यांना तंबूत लपवून ठेवलेल्या या वस्तू मिळाल्या. चांदी अंगरख्याच्या खाली होती.
23. त्या माणसांनी या वस्तू तेथून बाहेर काढल्या यहोशवा सर्व इस्राएल लोक ह्यांच्यापर्यंत आणून परमेश्वरापुढे ठेवल्या.
24. नंतर यहोशवा समस्त इस्राएल लोकांनी जेरहचा मुलगा आखान याला आखोर खोऱ्यात नेले. चांदी, सोने, अंगरखा, आखानची मुलेबाळे, जनावरे, गाढवे, शेळ्यामेंढ्या, त्याचा तंबू आणि होती नव्हती ती चीजवस्तू हे ही नेले.
25. तेव्हा यहोशवा म्हणाला, “तुझ्यामुळे आम्हाला फार त्रास झाला आहे. पण आता परमेश्वरच तुला संकटात टाकील” मग सर्व लोकांनी आखान आणि त्याचे कुटुंबीय यांच्यावर ते मरेपर्यंत दगडांचा मारा केला. मग त्यांना सर्व चीजवस्तूसह जाळून टाकले.
26. त्यानंतर आखानाच्या जळून गेलेल्या शरीरावर त्यांनी दगडांची रास रचली. हे दगड आज ही तेथे आहेत. अशा तऱ्हेने परमेश्वराने आखानावर आपत्ती आणली म्हणूनच त्या ठिकाणाचे नाव आखोर ची दरी असे पडले. यानतर परमेश्वराचा कोप झाला नाही.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×