Bible Versions
Bible Books

Numbers 13 (MRV) Marathi Old BSI Version

1 परमेश्वर मोशेला म्हणाला,
2 “कनान देश हेरण्यासाठी काही लोकांना पाठव. हाच देश मी इस्राएल लोकांना देणार आहे. त्यांच्या बारा वंशानुसार प्रत्येकी एका नेत्याला पाठव.”
3 तेव्हा मोशेने परमेश्वराची आज्ञा मानून, लोक पारानच्या वाळवंटात असताना हे नेते पाठविले.
4 त्यांची नांवे अशी आहेत:रऊबेन वंशातला जक्कुराचा मुलगा शम्मुवा.
5 शिमोन वंशातला होरीचा मुलगा शाफाट.
6 यहुदा वंशातला यफुन्नेचा मुलगा कालेब.
7 इस्साखार वंशातला योसेफाचा मुलगा इगाल.
8 एफ्राईम वंशातला नूनाचा मुलगा होशा.
9 बन्यामीन वंशातला सोदीचा मुलगा पलटी,
10 जबुलून वंशातला सोदीचा मुलगा गद्दीयेल,
11 योसेफ वंशातला (मनश्शे) - सूसीचा मुलगा गद्दी,
12 दान वंशातला गमल्लीचा मुलगा अम्मीयेल,
13 आशोर वंशातला मीकाएलाचा मुलगा सतूर,
14 नफताली वंशातला बाप्सीचा मुलगा नहब्बी.
15 आणि गाद वंशातला माकीचा मुलगा गऊवेल.
16 मोशेने देश हेरावयास पाठविलेल्या लोकांची ही नांवे होती. “(मोशेने नूनाचा मुलगा होशा ह्याचे नांव यहोशवा असे ठेविले.)
17 मोशेने कनान देश हेरण्यास पाठविताना लोकांना सांगितले की तुम्ही येथून नेगेबमधून निघा आणि मग डोंगराळ प्रदेशात जा.
18 देश कसा आहे? तेथील लोक कसे आहेत! ते बलवान आहेत किंवा दुबळे आहेत? ते थोडे आहेत किंवा फार आहेत? ते पाहा समजून घ्या.
19 ते राहतात तो देश कसा आहे? तो चांगला आहे किंवा वाईट आहे? ते लोक कशा प्रकारच्या नगरात राहतात? संरक्षणासाठी त्या नगरांभोवती कोट आहेत का? त्या नगरांची संरक्षण व्यवस्था बलवान आहे का? ह्या सर्व गोष्टी पाहा समजून घ्या. तेथील जमीन पीक घेण्यास
20 योग्य आहे का? त्या प्रदेशात झाडे आहेत का? तेथील काही फळे बरोबर घेऊन या.” (हे पहिली द्राक्षे पिकण्याच्या वेळी घडले.)
21 म्हणून ते तो प्रदेश शोधायला निघाले. त्यांनी सीन वाळवंटापासून रहोब आणि लेबोहामाथपर्यंतच्या प्रदेशाचा शोध घेतला.
22 त्यांनी नेगेवमधून त्या प्रदेशात प्रवेश केला आणि ते हेब्रोनला गेले. (हेब्रोन शहर मिसर देशातल्या सोअन शहराच्या सात वर्षे आधी बांधले होते.) अहीमन शेशय आणि तलमय हे अनाकाचे वंशज तेथे राहात होते.
23 नंतर ते लोक अष्कोलच्या खोऱ्यात गेले. तेथे त्यांनी द्राक्षाच्या वेलीची एक फांदी तोडली. त्या फांदली द्राक्षाचा घड लागलेला होता. त्यांनी ती फांदी एका खांबावर ठेवली आणि दोघे जण ती आपल्या मधोमध ठेवून घेऊन गेले. त्यांनी बरोबर काही डाळींबे अंजीर ही घेतली.
24 त्या जागेला अष्कोल खोरे असे म्हणतात कारण तिथे इस्राएल लोकांनी द्राक्षाचा घड तोडला होता.
25 त्या लोकांनी त्या प्रदेशाचा 40 दिवस शोध घेतला. नंतर ते आपल्या छावणीत परत गेले.
26 इस्राएल लोकांची छावणी पारानच्या वाळवंटात कादेशजवळ होती ते लोक मोशे, अहरोन आणि इस्राएलच्या सर्व लोकांजवळ गेले. त्यांनी मोशे, अहरोन आणि इतर लोकांना त्यांनी पाहिलेल्या गोष्टीविषयी सांगितले आणि त्या प्रदेशातली फळे त्यांना दाखवली.
27 ते लोक मोशेला म्हणाले, “तू आम्हाला पाठवलेस त्या प्रदेशात आम्ही गेलो. तो प्रदेश अनेक चांगल्या गोष्टींनी भरलेलाआहे. त्या प्रदेशात होणारी ही काही फळे पाहा.
28 पण तेथे राहणारे लोक खूप शक्तिशाली आहेत. शहरे खूप मोठी आहेत. शहरांचे रक्षण चांगल्या प्रकारे होते. काही अनाकांच्या वंशाजानाही आम्ही पाहिले.
29 अमालेकी लोक नेगेबमध्ये राहतात. हित्ती, यबूसी आणि अमोरी डोंगराळ भागात राहतात. आणि कनानी लोक समुद्राजवळ आणि यार्देन नदीच्या काठावर राहतात.”
30 मोशेजवळच्या लोकांना गप्प बसायला सांगून कालेब म्हणाला, “परत जाऊन तो प्रदेश आपण घ्यायला पाहिजे. आपण तो प्रदेश सहज घेऊ शकू.”
31 पण जे लोक त्याच्याबरोबर तेथे गेले होते ते म्हणाले, “आपण त्यांच्याशी लढू शकणार नाही. ते आपल्यापेक्षा खूप शक्तिशाली आहेत.
32 आणि त्या माणसांनी इस्राएलच्या सर्व लोकांना सांगितले की त्या प्रदेशातल्या लोकांचा पराभव करण्याइतके शक्तिशाली आपण नाहीत. ते म्हणाले, “आम्ही जो प्रदेश पाहिला तो शक्तिशाली लोकांनी भरलेला आहे. ते लोक तिथे जाणाऱ्या कुठल्याही माणसाचा सहज पराभव करण्याइतके शक्तिमान आहेत.
33 आम्ही तिथे खूप नेफीलीम लोक पाहिले. (अनाकाचे वंशज नेफीलीम लोकांपासून आलेले आहेत) त्यांनी आमच्याकडे आम्ही जणू नाकतोडे आहोत अशा नजरेने पाहिले. होय! त्यांच्या दृष्टीने आम्ही नाकतोडेच होतो.”
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×